Pune Accident: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
esakal January 15, 2025 04:45 PM

Pune: अज्ञात ट्रकने दुचाकीला मागील बाजूने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्यामागे बसलेला त्याचा सहकारी या अपघातात गंभीर जखमी झाला. पुणे- नगर रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्याजवळ सोमवारी (ता. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातातील मृत व जखमी हे मूळचे संभाजीनगर जिल्ह्यातील असून, रांजणगाव एमआयडीसीत खासगी कंपनीत कामाला होते.


शंकर भगवान सालपे (वय २५, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर) असे या अपघातातील मृत दुचाकीस्वार कामगाराचे नाव असून, त्याच्या मागे बसलेला त्याचा सहकारी कामगार दादासाहेब साहेबराव कदम (वय ५२) हे या अपघातात जखमी झाले. दुचाकीला ठोकर दिलेला ट्रक न थांबता निघून गेला असून, कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भायगाव गंगा (ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेले शंकर सालपे व दादासाहेब कदम हे रांजणगाव एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामाला असून, दोन दिवसांपूर्वी ते मूळगावी गेले होते. तेथून परत कामावर हजर होण्यासाठी आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २० ईएन ६३३२) नगर- पुणे रस्त्याने कारेगावकडे येत असताना बोऱ्हाडे मळ्याजवळील (ता. शिरूर) मैत्रेय पेट्रोल पंपासमोर मागील बाजूने भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला ठोकरले.

यात रस्त्यावर फेकले गेल्याने सालपे व कदम हे गंभीर जखमी झाले. त्यात डोक्याला मार लागल्याने सालपे यांचा मृत्यू झाला, तर कदम यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला असून, पुढील तपास पोलिस हवालदार डी. एस. राऊत करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.