Congress News : काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील या काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. शहरातील काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला आणखी एक उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
डॉ. हेमलता पाटील यांनी फेसबुकवर याबाबतची पोस्ट टाकली आहे. येत्या एक-दोन दिवसांत त्या पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहेत. एका अर्थाने त्यांनी आधीच हा निर्णय घेतलेला असावा. आता फक्तत की भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा एवढेच बाकी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ पक्षाला हवा होता. त्यासाठी पाटील यांच्यासह विविध इच्छुक उमेदवार होते. या इच्छुकांनी पक्षावर मोठा दबाव निर्माण केला होता. मात्र ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आली. त्यातून ही नाराजी असल्याचे संबंधितांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नाशिक शहरातून एकही मतदारसंघात संधी मिळाली नव्हती. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक नगरसेवक पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे.
विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्वस्थ आहेत. महायुती राज्यात अधिक भक्कम झाल्याने या नगरसेवकांना सत्तेत राहण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घ्यावा लागत आहे. या स्थितीतही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव पडत नसल्याने त्यांनी यावर काहीही उपाय केल्याचे दिसत नाही.
पाटील ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या प्रभागातील एक प्रबळ उमेदवार म्हणून माजी नगरसेवक जॉय कांबळे आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला स्वबळावर येथे झुंजावे लागणार आहे. यातूनच पाटील यांनी सोपा पर्याय म्हणून अन्य पक्षाचा विचार केला असावा. आता त्या राजकीय स्थिती विचारात घेता शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.