Box Office Collection: फक्त पाच दिवसात सुबोधच्या संगीत मानापमानने केली 'इतकी' कमाई ; जाणून घ्या कसा वाटला प्रेक्षकांना सिनेमा
esakal January 15, 2025 09:45 PM

Marathi Movie Box Office Collection : अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावेचा बहुप्रतीक्षित संगीत मानापमान हा सिनेमा रिलीज झाला. वर्षाच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाबरोबरच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वातील अनेक दमदार सिनेमे रिलीज झाले असताना या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे जाणून घेऊया.

केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांचं अजरामर असलेलं संगीत नाटक संगीत मानापमान या नाटकावर हा सिनेमा आधारित आहे. आणि भामिनी यांची गोष्ट असलेल्या या गाजलेल्या नाटकाचं सिनेमाचं रूपांतर प्रेक्षकांना कसं वाटलं आणि सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतोय याविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक आहेत.

Sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत या सिनेमाने 1.54 करोड रुपयांची कमाई केली. तर भारतात या सिनेमाने पाच दिवसात 1.37 रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाला मिळालेला प्रतिसाद थंड होता. या सिनेमाने फक्त 20 लाख रुपयाने ओपनिंग केली. पण शनिवार-रविवार मराठी प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या सिनेमाने शनिवारी 37 करोड तर रविवारी 50 करोड रुपयांची कमाई केली. सोमवारी या सिनेमाने 13 करोड आणि मंगळवारी 17 करोड रुपयांची कमाई केली आहे.

सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत हा सिनेमा आवडल्याचं म्हटलं आहे. तर (IMDB) या सिनेमाला प्रेक्षकांनी 10 पैकी 9 इतकं रेटिंग दिलं आहे. मुंबई, पुणे व्यतिरिक्त सांगली, बेळगाव, नाशिक या भागात या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अनेक संगीतप्रेमी आवर्जून या सिनेमासाठी हजेरी लावत आहेत. तर लहान मुलांचीही संख्या लक्षणीय आहे.

"वैदेही परशुरामीचे खूप कौतुक करा,तिनेही सुंदर अप्रतिम ॲक्टिंग केली आहे.फारच सुंदर......" असा रिव्ह्यू एका प्रेक्षकाने टाकला आहे तर एकाने "माझे मित्र आणि मी आजच बेळगावला ग्लोब सिनेमा थेटर मध्ये संगीत मानापमान चित्रपट पाहिला, अप्रतिम उत्कृष्ट चित्रपट वाटला धैर्यशील व भामिनी या भूमिका उत्कृष्ट शेवट फारच सुंदर यशस्वी." अशी कमेंट करत सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं.

Sangeet Manapaman
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.