परमपूज्य भालचंद्र महाराजांचा
जन्मोत्सव सोहळा आजपासून
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १५ ः भालचंद्र महाराज जन्मोत्सव उद्यापासून (ता. १६) २० जानेवारीपर्यंत साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज भालचंद्र महाराज यांचा १२१ वा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. उद्या सकाळी महापूजा, पहाटे काकड आरती, समाधी पूजन, आरती, महाप्रसाद, भजने, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (१९) रक्तदान शिबिर होणार असून यावेळी १२१ जणांचा रक्तदानाचा संकल्प आहे. सोमवारी (२०) जन्मोत्सव साजरा होणार असून काकड आरती, भजने, समाधीस्थानी लघुरुद्र, जन्मोत्सव, कीर्तन होणार आहे. दुपारी बारा वाजता भालचंद्र महाराज जन्मोत्सव सोहळा. त्यानंतर आरती, महाप्रसाद, सायंकाळी शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उद्या दुपारी ३.३० ते ७ या वेळेत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होतील. शुक्रवारी (१७) दुपारी ३ वाजता संगीत अलंकार वीणा हेमंत दळवी आणि सहकारी होडावडे वेंगुर्ला यांचा ‘स्वरसंध्या’ कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच ते सात दरम्यान मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय संगीताचा व अभंग नाट्यपदाच्या मैफलीचा ‘गुरुवंदना’ कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (१८) दुपारी चार वाजता दशावतार नाट्य मंडळ बिडवाडी यांचे ‘भक्तांचा कैवारी- कृष्ण मुरारी’ हे नाटक सादर होईल. रविवारी कणकवली तालुक्यातील निवडक दशावतारी कलाकारांचे पौराणिक नाटक आयोजित केले आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.