पुणे, ता. १५ : नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत नाशिकच्या देवळाली हायस्कूलच्या सविता लवेरी, आरती ठोके यांनी समृद्धी कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसंचालक डॉ. आय. पी. नदाफ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर, टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. माधुरी इसावे, कला क्रीडा विभागाचे विषय विभागप्रमुख सचिन चव्हाण, अधिव्याख्याता संघप्रिया वाघमारे, संगीत शिक्षिका पद्मजा लामरुड आदी उपस्थित होते.
अनुभवात्मक शिक्षणावर आधारित अध्ययन, अध्यापन पद्धतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतूने रंगोत्सव आणि समृद्धी स्पर्धेचे आयोजन केले होते. रंगोत्सव कार्यक्रमात १९२ विद्यार्थी आणि २३ प्राथमिक शिक्षक सहभागी झाले. तर समृद्धी कार्यक्रमात १६ माध्यमिक शिक्षक सहभागी झाले. रंगोत्सव कार्यक्रमात डॉ. बनकर, डॉ. इसावे, डॉ. प्रिया इंझळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर समृद्धी कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. गीता शिंदे, दत्तात्रेय तापकीर, निर्मला थोपटे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या (भोर) प्राचार्य डॉ. संध्या चव्हाण यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.