जळगाव : जगभरात चटई निर्यातीसाठी अग्रेसर असलेला जळगावचा चटई उद्योग शासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत सापडल्याचं दिसतंय. सर्वाधिक वीज दर आणि वाढत्या करामुळे चटई उद्योग परवडत नसल्याने अनेक उद्योग हे बंद पडले आहेत. तर काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योग, हा देशभरात आणि युरोपीयन देशांमध्ये निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्या या उद्योगाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील 150 ते 160 चटई उद्योगांपैकी मागील सहा महिन्यांत 25 ते 30 उद्योग बंद पडले आहेत. यामुळे सुमारे 600 ते 700 कामगार थेट आणि तितक्याच अप्रत्यक्षरित्या जोडलेल्या लोकांवर बेरोजगारीचे संकट आलं आहे.
जळगाव एमआयडीसी मधील चटई उद्योगाची वार्षिक उलाढाल ही 1200 ते 1,500 कोटींच्या घरात आहे. प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून जळगावमध्ये चटई तयार केली जाते. ज्यामुळे ती टिकाऊ आणि पर्यावरणपूरक ठरते. देशांतर्गत बाजारपेठेसह आशिया खंडातील काही देश आणि युरोपियन देशांमध्ये या चटईंना मोठी मागणी आहे.
देशभरातून निर्यात होणाऱ्या एकूण चटईंपैकी 70 ते 80 टक्के चटई ही जळगाव जिल्ह्यातून निर्यात केली जाते. मात्र महाराष्ट्रासह जळगावमध्ये सध्या वीजेचे असलेले उच्च पातळीवरील दर हे इतर राज्याच्या तुलनेत अधिक आहेत. त्यात पुन्हा चटई स्क्रॅपवर 18 टक्केजीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे चटई उत्पादनात इतर राज्याच्या तुलनेत वाढलेला खर्च हा जळगावमधील चटई उद्योगाच्या दृष्टीने अडचणीचा ठरला आहे.
जळगावमध्ये वाढत्या उत्पादन खर्चामुळे इतर राज्यातील चटई उद्यागाशी स्पर्धा करताना मोठी अडचण येत असल्याने,अनेक उद्योग हे डबघाईला आल्याचं पाहायला मिळत आहे. वाढता उत्पादन खर्च परवडत नसल्याने काही उद्योग हे बंद पडले आहेत. तर काही उद्योगांनी इतर राज्यात स्थलांतर केलं आहे.
जळगावमधील जवळपास 150 ते 160 उद्योगांपैकी 30 ते 40 उद्योग बंद पडल्याने जिल्ह्यातील सुमारे 10 ते 20 हजार लोकांचा रोजगार धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जळगावच्या चटई उद्योगाला टिकवण्यासाठी आणि उद्योजकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. या मध्ये प्रामुख्याने इतर राज्यांप्रमाणे वीजदर कमी करणे, स्क्रॅपवरील जीएसटी कमी करणे, तसेच सरकारी अनुदान उपलब्ध करून देणे, निर्यातीसाठी लागणाऱ्या सोई सुविधा, परवाने सहजरित्या मिळावे अशा प्रकारच्या सुविधा सरकारने या उद्योगास द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. या मागण्या मान्य झाल्यास जळगावचा चटई उद्योग हा पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहू शकेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.
अधिक पाहा..