Crow Deaths : साठ तासांत 150 कावळ्यांचा मृत्यू
esakal January 16, 2025 04:45 AM

उदगीर : उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक परिसर, शहर पोलीस ठाण्याचा आवारात कावळ्यांचे मोठे अस्तित्व आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून अनेक कावळे झाडांच्या खाली मृतावस्थेत पडलेले आढळून येत आहेत. या तीन ठिकाणीच प्रशासनाला कावळे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे पशु वैद्यकीय विभाग सतर्क झाला. या कावळ्यांचे मृतदेह गोळा करण्यात आले आहेत. मंगळवारी (ता.१४) व बुधवारी (ता.१५) रोजी दिवसभर झाडाखाली जवळपास दिडशे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही पायावर बसलेले कावळे सुरुवातीला पेंगतात, नंतर मान वाकडी होते आणि ते जमिन जमिनीवर कोसळतात. अशा पध्दतीने गेल्या ६० तासात उदगीर शहरातील तीन ते चार ठिकाणी दिडशे कावळे मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ३ कावळ्यांवर उदगीरच्या पशू सर्वचिकीत्सालयात उपचार करण्यात येत आहेत. उदगीर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानंतर मृत कावळ्यांच्या रक्ताचे नमुने पुणे व भोपाळ येथील पशुरोग अन्वेषण विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

शहरातील महात्मा गांधी उद्यान, शहर पोलीस ठाण्याचा परिसर, हुतात्मा स्मारक, नगरपालिका जलशुद्धीकरण परिसरात मोठी झाडी असून येथे पक्षांचा अधिवास आहे. याच परिसरात जवळपास ५० पेक्षा अधीक कावळे झाडांच्या खाली मृतावस्थेत आढळून आले आहेत. या मृत कावळ्यांचे शव गोळा केल्यानंतर उदगीर नगरपालिकेच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यांना गाढण्यात आले आहे. हा बर्ड फ्ल्यू सारखा प्रकार असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू होत असल्याची बाब शहरातील पक्षी मित्रांनी प्रशासनाच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर तहसीलदार राम बोरगावकर यांनी पशु वैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांना आदेश दिले. त्यानंतर महात्मा गांधी उद्यान, शहर पोलीस ठाण्याचा परिसर, हुतात्मा स्मारक, नगरपालिका जलशुद्धीकरण परिसर आदी ठिकाणांहून कावळ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तर या अज्ञात आजाराची लागण झालेल्या ६ कावळ्यांवर सध्या उदगीरच्या पशु सर्वचिकीत्सालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृतीही नाजुक असल्याचे डॉ. प्रकाश धोंड यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरु नये

शहरात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचा प्रकार काही पक्षिमित्रांनी आमच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे पशू वैद्यक विभाग सतर्क झाला असून अशा कावळ्यांचा शोध घेण्यात येत आहे. मृत कावळ्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. लवकरच त्याचा रिपोर्ट येईल. नागरिकांनी घाबरून जावु नये.

राम बोरगावकर, तहसीलदार, उदगीर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.