मुंबई : ‘‘मतदारसंघाच्या विकासासाठी मोठे प्रकल्प निश्चित आणा. यामुळेच जनतेसाठी प्रगतीची दारे खुली होत असतात पण आपण खूप मोठे काम केले, महाकाय प्रकल्प आणले म्हणून केवळ त्या जोरावर निवडून येऊ शकू या भ्रमात राहू नका. प्रतिमेबरोबरच आमदारांसाठी पुन्हा जिंकण्यासाठी जनसंपर्क आवश्यक असतो. विकास कामे करा अन् कायम जनतेत राहा. लोकांच्या गोष्टी ऐकून घ्या तसेच त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी व्हा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महायुतीच्या आमदारांना केले.
राज्यातील सत्तारूढ पक्षांच्या पावणे दोनशे आमदारांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून मार्गदर्शन केले. दरवर्षी नित्यनेमाने स्वत:ची वैद्यकीय चाचणी करून घेणाऱ्या आमदारांनी हात वर करावेत, लेकीचे बाप असलेले आमदार कोणकोण आहेत असे प्रश्न करीत त्यांनी लोकांमधील वावर कधीही कमी होऊ देऊ नका असा कानमंत्र दिला. सुमारे दीड तास आमदारांशी गुजगोष्टी केल्यानंतर मोदींनी त्यांच्यासोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.
या संवादाच्या प्रारंभीच मोदींनी आमदारांना बोलते करत त्यांची मते जाणून घेतली. किती आमदार वर्षभरात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी आरोग्याची तपासणी करतात असा प्रश्न विचारताच काही आमदारांनी हात वर केले. पंतप्रधानांनी त्यांना शाबासकी दिली. ‘जान है तो जहान है’ असा संदेश देत मोदींनी कुटुंबालाही वेळ देण्याची सूचना केली.
आपल्या मुलीकडे लक्ष द्यामोदी म्हणाले,‘‘ घरी मुली असतील तर त्यांच्याशी जास्त प्रेमाने बोला, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या, एखादी मुलगी कळी उमलावी तशी उमलत फूल होते मग तिचे लग्न होते. एकदा का लग्न झाले की ज्या मुलीला प्रेमाने सांभाळले त्या मुलीकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. तिने घर सांभाळावे, स्वयंपाकाकडे लक्ष द्यावे, कुटुंबीयांची काळजी घ्यावी, वृद्धांची सेवा करावी, मुलांचे पालन करावे अशा सगळ्या अपेक्षांचे ओझे तिच्यावर कळत नकळत समाजाकडून लादले जाते. लोकप्रतिनिधींचेही तसेच असते जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधी नसतो तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे जगू शकतो.
एकदा का आमदार खासदार किंवा अगदी नगरसेवक या पदावर आपली निवड झाली की मग हजारो नजरा आपण काय करतो याकडे लागलेल्या असतात. आमदार कसा चालतो, कसा बोलतो, कोणाबरोबर असतो,त्याच्या भोजनात काय असते ? अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे जनता लक्ष ठेवते त्यामुळेच आमदाराने स्वतःच्या प्रतिमेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली कृती ही प्रतिमा चांगली होईल अशीच असली पाहिजे. वर्तन देखील पक्षाचा, सरकारचा मान वाढविणारे असायला हवे.’’
सक्रिय राहण्याचे रहस्य सांगितलेभाजपप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी देखील मोदींशी संवाद साधला. आमदारांनी विचारलेले प्रश्न अनौपचारिक स्वरूपाचे होते त्यालाही त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. या प्रश्नांनी राजकीय वळण घेताच मोदींनी शांतपणे विषय पुन्हा एकदा कौटुंबिक चर्चेकडे वळविला असे कळते.
आमदारांनी प्रकृतीची हेळसांड करू नये असे सांगताच काहीजणांनी आपण आपला व्यग्र दिनक्रम कसा सांभाळता, तब्येतीसाठी कसा वेळ देता असे सवाल मोदींना केले. यावर त्यांनीही खुल्या मनाने उत्तरे दिली. आपण सतत सक्रिय कशामुळे राहू शकतो याचे रहस्यही त्यांनी आमदारांना सांगितले.
भोजनाचा आस्वाद घेतलामोदींनी सर्व आमदारांसमवेत आयएनएस आंग्रे या सभागृहात भोजनाचाही आस्वाद घेतला. शाकाहारी भोजनाची लज्जत काही वेगळीच असते असे सांगताना त्यांनी काही आमदारांना ‘क्यों भाई क्या खाया क्या खा रहे हो’ असेही प्रश्न विचारत संवादाची तार छेडण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण संवादात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओळखपर प्रास्ताविक केले पण दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र गप्पच होते.
‘‘आज या सभागृहात झालेली चर्चा ही आपल्या घरातील गोष्ट आहे त्याबद्दलचे कोणतेही तपशील आमदारांनी बाहेर सांगू नये, हा प्रसिद्धी माध्यमांच्या चर्चेचा विषय नाही त्यांच्यापर्यंत या गुजगोष्टी पोहोचविण्याची काही एक गरज नाही,’’ असेही मोदींनी हसत सांगितल्याचे कळते.