संगणकीय शिक्षणाने करियरला दिशा
esakal January 17, 2025 10:45 PM

39056

संगणकीय शिक्षणाने करियरला दिशा
नम्रता कुबलः वेंगुर्ले शाळेस राष्ट्रवादीतर्फे सहा संगणक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ः मुलांना घडविण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करावा. संगणकीय शिक्षणामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढीस लागेल, शिवाय विद्यार्थ्यांच्या करियरला योग्य दिशा मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष नम्रता कुबल यांनी येथे केले. येथील कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत संगणक प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेश महिला उपाध्यक्ष नितीन कुबल यांनी केलेल्या मागणीनुसार वेंगुर्ले-कुबलवाडा येथील राणी लक्ष्मीबाई शाळेला विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सहा संगणक संच दिले. या संगणकांचा प्रदान सोहळा बुधवारी (ता. १५) शाळेच्या मुख्याध्यापका प्रतिमा पेडणेकर यांच्या मुख्य उपस्थितीत झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा सदस्य नितीन कुबल, वेंगुर्ले शहर प्रभारी अध्यक्ष स्वप्नील रावळ, ज्येष्ठ नागरिक शेखर वेंगुर्लेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयेश मांजरेकर, शिक्षिका मुग्धा कनयाळकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती नेरुरकर, माता संघाच्या अध्यक्ष अनुक्षा राजापूरकर, अंगणवाडी सेविका अश्विनी पालव, सागर रेडकर आदी उपस्थित होते.
कुबल पुढे म्हणाल्या, ‘‘प्राथमिक शाळेत असताना विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, या दृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या या संगणकांचा उपयोग मुलांना घडविण्यासाठी होणार आहे. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी उद्याचा आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करावा. संगणकीय शिक्षणामुळे या शाळेत विद्यार्थी संख्या वाढीस लागेल आणि शरद पवार यांना अपेक्षित असलेले संगणकातून टॅलेंटेड विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे.’’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.