wt१७१.jpg
३९२७६
कुडाळः जय हनुमान संघ परुळे संघाच्या विजय घोलेकर याला सामनावीरने सन्मानित करताना मंगेश तेंडुलकर, सुनिल धुरी, नितिन नेमळेकर, जीवन बांदेकर, सचिन कांबळी आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
परुळे हनुमान संघ उपांत्य फेरीत
कुडाळातील क्रिकेट स्पर्धाः जिल्ह्यासह गोव्यातील संघांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः प्रिन्सपोर्ट क्लब समादेवी मित्रमंडळ कुडाळ आणि श्री देव कलेश्वर मित्र मंडळ नेरुर आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जय हनुमान परुळे संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
येथील क्रीडा संकुलात प्रिन्स समादेवी मित्र मंडळ कुडाळ व कलेश्वर मित्र मंडळातर्फे आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी जय हनुमान परुळे संघ सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत दाखल झाला. पहिला सामना जय हनुमान परूळे व रामेश्वर घावनळे या दोन संघांमध्ये झाला. स्पर्धेतील पहिली सुपर ओवर या सामन्यात अनुभवता आली. सुपर ओव्हरमध्ये जय हनुमान परुळे संघाने बाजी मारली. सागर पाटकर सामनावीराचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थ हळदोना संघाने हेमहिरा दोडामार्ग संघावर विजय मिळवला. या संघातील कल्पेश गवस सामनावीराचा मानकरी ठरला. तिसरा सामना ध्रुव पार्से गोवा व फ्रेंड सर्कल डिगस या संघांमध्ये झाला. स्थानिक खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाने बलाढ्य ध्रुव पारसे गोवा या संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. या संघाचा रंजन केणी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुढील सामना जय हनुमान परुळे व स्वामी समर्थ हळदोना या दोन संघांमध्ये झाला. परुळे संघाने स्वामी समर्थ संघाचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. परुळे संघाचा विजय घोलेकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पुढील सामना एएसपी वेंगुर्ला व फ्रेंड सर्कल डिगस या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये डिगस संघाने बाजी मारली. दोन षटकांमध्ये तीन धावा देऊन दोन गडी बाद करणारा पायस अल्मेडा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यामध्ये फ्रेंड सर्कल डिगस संघाने प्रथम फलंदाजी करताना रंजन केणीच्या २४ धावांच्या जोरावर मर्यादित सहा षटकांमध्ये ४७ धावांपर्यंत मजल मारली. परुळे संघातर्फे सागर पाटकर व साई केरकर यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रत्युतरा दाखल ४८ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकांमध्ये परुळे संघाचे तीन गडी बाद करून पायस अल्मेडा यांनी एकच खळबळ उडवून दिली. मात्र, विजय घोलेकर, सागर पाटकर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर दोन चेंडू राखत ४८ धावांचे आव्हान पूर्ण करत जय हनुमान संघ परुळे यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आजच्या दिवशी स्पर्धेसाठी पंच म्हणून संदीप रुद्रे, उमेश मांजरेकर, सुशील शेडगे यांनी काम पाहिले तर गुणलेखन रुपेश कुडाळकर, सचिन कांबळी, सहदेव घाडीगावकर यांनी केले. समालोचन अशोक नाईक, शेखर दळवी तसेच योगेश परब यांनी केले.