टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. निवड समितीने 12 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करण्यासाठी निवड समितीने आयसीसीकडे अधिकचा वेळ मागितला. कुणाला संधी द्यायची, कुणाला नाही? तसेच जसप्रीत बुमराह याची दुखापत या कारणामुळे निवड समितीने वाढीव मुदत मागितल्याचं म्हटलं जात आहे. आता निवड समिती शनिवारी 18 जानेवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी भारतीय संघाची घोषणा करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघे पत्रकार परिषदेतून खेळाडूंची नावं जाहीर करणार आहेत. निवड समिती करुण नायर याला संधी देते का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणारी एकदिवसीय मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळाडूच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळतील, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ सारखेच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियातून गेली अनेक वर्ष दूर असलेला फलंदाज करुण नायर याने निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. करुणने त्याच्या नेतृत्वात विदर्भाला विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहचवलंय. करुणने विजय हजारे ट्रॉफीतील या हंगामात 7 सामन्यांमध्ये 5 शतकांसह 700 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. करुणने अप्रतिम कामगिरीसह टीम इंडियाचे दार ठोठावले आहेत. करुणला संधी द्यावी, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांकडून होत आहे. तर आता दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने एक्स पोस्टद्वारे करुण नायरच्या कामगिरीचं कौतुक केलंय. त्यामुळे करुणच्या पाठीशी साक्षात क्रिकेटचा देवच आहे. त्यामुळे निवड समिती करुणबाबत काय निर्णय घेते? याबाबत साऱ्यांनाच उत्सूकता लागून आहे.
सचिनने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत करुणच्या विजय हजारे ट्रॉफीतील कामगिरीचं कौतुक केलं आहे. “7 डावांमध्ये 5 शतकांच्या जोरावर 752 धावा करणं हे अद्भूत कामगिरीपेक्षा कमी नाही. अशी कामगिरी सहजासहजी होत नाही, अशा कामगिरीसाठी ध्यान आणि कठोर मेहनतीनंतरच शक्य आहे. अशा पद्धतीने प्रत्येक संधीचं सोनं कर”, असं म्हणत सचिनने करुणला शुभेच्छा दिल्या आहेत.
करुणसाठी सचिनची पोस्ट
दरम्यान करुणने या हंगामात बॅटिंगने धावांचा पाऊस पाडला आहे. करुण या हंगामातील 7 पैकी फक्त 1 डावातच आऊट झालाय. यावरुन त्याने काय बॅटिंग केलीय, याचा अंदाज येईल. करुणने एकूण 752 धावा केल्या आहेत. करुणने या दरम्यान एकूण 5 शतकं झळकावली आहेत. त्यापैकी 4 शतकं ही सलग झळकावली आहेत. आता शनिवारी 18 जानेवारी रोजी कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा अंतिम सामना रंगणार आहे. तसेच 18 जानेवारीलाच संघ जाहीर होणार आहे. त्यामुळे करुणसाठी एक कर्णधार आणि एक खेळाडू म्हणून शनिवार फार निर्णायक ठरणार आहे. आता शनिवारी करुणच्या बाजूने निर्णय लागतो की विरोधात? हे येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल.