पुणे : स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले. हा बांगलादेशी नागरिक दहा वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पारपत्र, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले आहे.
एहसान हाफीज शेख (वय ३४, सध्या रा. महर्षीनगर, गुलटेकडी, मूळ रा. बांगलादेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार सोमनाथ ढगे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एहसान शेख याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने २०१४ मध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्याने स्वारगेट परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. याबाबत स्वारगेट पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महर्षीनगर परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पारपत्र आणि मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याने बनावट कागदपत्रे कशी मिळविली, कागदपत्रे तयार करून देण्यात कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील करीत आहेत.