संवाद क्राबी-फुकेतमधील स्त्रियांशी...
esakal January 19, 2025 09:45 AM

- शाहीन इंदूलकर, shahin.indulkar@gmail.com

थायलंडच्या क्राबी आणि फुकेत या दोन प्रदेशांत गेल्याच महिन्यात जाऊन आले. हे दोन्ही प्रांत थायलंडच्या दक्षिणेला आहेत. निळा समुद्र आणि त्यात उभी असलेली उंच, दगडी, दाट वेली-झुडपांनी आच्छादलेली, वेगवेगळ्या आकारांची शेकडो बेटं. नुसतं गूगल करून किंवा इन्स्टाग्रामवर जरी बघितलंत, तरी तुम्हाला तिथे जाऊन ‘कहो ना प्यार हैं’ चा डान्स करायचा मोह होईल. ते माझंही करून झालंय!

लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे तिथलं खाणं, तिथले लोक, त्यांची घरं-दुकानं आणि एकूणच वावरणं. त्यांच्या घरांसमोर, दुकानांसमोर तुळशी वृंदावनासारखी उभी देवघरं बांधलेली असतात. त्याला ‘सान फ्रा फम’ म्हणतात. थाई लोकांचा असा विश्वास आहे, की आपल्याला संरक्षण देणारे आत्मे या छोट्या घरांमध्ये राहतात, म्हणून ते त्यांच्या घर किंवा व्यवसायाच्या समोर हे बांधतात.

हे सगळं बघत, अनुभवत आणि तिथल्या लोकांशी गप्पा मारत केलेला प्रवास त्या ठरावीक दिवसांसाठी का होईना, पण आपण त्यांच्यातलेच आहोत असा अनुभव देऊन गेला. जॉन लेननच्या ‘Imagine’ या गाण्यात अशा जगाची कल्पना आहे, जिथे कुठल्याही भौगोलिक-भाषिक-धर्म-जातीय सीमा लागू होऊ नयेत. त्या गाण्याच्या नादावर जगाच्या पाठीवर कुठेही फिरलं तर एक आपलेपणाचा अनुभव आल्यावाचून राहणार नाही.

गप्पिष्ट स्वभावामुळे असेल कदाचित, पण कुठेही फिरायला जाताना तिथलं जनजीवन समजून घेणं हा माझा आवडता विषय असतो. मुंबईतला रोजचा ट्रेनचा प्रवास करतानासुद्धा त्या शहराचं जनजीवन थोडक्यात, पण स्पष्ट कळतं. त्या शहराचे सामाजिक-आर्थिक पैलू, जगण्यातले ताण आणि उत्सव यांची झटपट ओळख करून देणारा असतो तो प्रवास.

त्यामुळे कुठल्याही छोट्या-मोठ्या प्रवासात कान आणि डोळे सतत उघडे असले तर फायदेशीर ठरतात. नाईयांग हे फुकेत विमानतळाजवळचं एक छोटं गाव. थायलंडला पोहोचताच आम्ही त्या गावात गेलो. फुकेतच्या मुख्य शहरापासून आणि पर्यटनक्षेत्रापासून लांब असल्याने तिथे मला हवी असलेली शांतता होती.

आपल्याकडच्या गावांमध्ये आठवडी बाजार भरावा तशा तऱ्हेची तात्पुरती बसवलेली दुकानं- भाज्या, फळं, रोज लागणाऱ्या घरातल्या वस्तूंची, वगैरे गावातल्या एका मोकळ्या भागात होती. बाकी काही मोजकी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स. तिथेच एका रिकाम्या काळोख्या चौकात माझं लक्ष गेलं ते उघड्यावर असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटकडे. ती जागा म्हणजे एक उघडं काउंटर, बाजूला गवती लॉन आणि त्यावर मांडलेली काही टेबलं आणि खुर्च्या.

१५ ते २० लोक आरामात बसतील एवढी सोय. काउंटरसमोरही बसायला तीन-चार स्टूल होते. त्या वेळेस रेस्टॉरंटमध्ये फक्त एकच चार जणांचा ग्रुप होता. तेही तिथलेच स्थानिक थाई मुलं-मुली. संध्याकाळ होती, ख्रिसमसचे दिवस. परदेशी लोकांना आकर्षित करण्यासाठी थोडंफार रोषणाई आणि बाकी सजावट करणं चालू होतं. रेस्टॉरंट चालवणाऱ्या विशीतल्या तीन मुली होत्या.

त्यातली एक सजावट करण्यात व्यग्र होती, दुसरी खाण्यापिण्याच्या ऑर्डर्स घेण्यात-वाढण्यात आणि तिसरीचं काम काउंटरवर बसून फक्त गप्पा मारणं! मी ते हेरलं आणि त्या काउंटरच्या स्टूलवर तिच्यासमोर जाऊन बसले. पुढचे दोन तास मजेत गेले. ती सुचवेल ते खाणंपिणं आणि जोडीला गप्पा. ती ‘सूरत धानी’ या अतिशय सुंदर असलेल्या थायलंडच्या प्रांतातली होती. तिचं नाव होतं ‘मा’. टॉमबॉय अवतार आणि मिश्कील हास्य.

मा धर्मानं बुद्धिस्ट होती पण म्हणाली, की त्यात तिला काही रस नाही. तरीही एकदा घरच्यांबरोबर भारतात गया इथं (जिथे गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं) येऊन गेलेली होती. नाईयांग गावात मैत्रिणीबरोबर ती राहते, रेस्टॉरंट चालवते, ते आवड म्हणून; पण तिचा मुख्य जॉब आठवड्यातून एक दिवस जवळच्या फुकेत एअरपोर्टवर असतो.

रेस्टॉरंटमध्ये लावलेल्या गाण्यांवरती डुलत आपल्या पेयाचा आनंद घेत ती व्यवसाय करत होती. तिने सुचवलेलं पॅड थाई, टॉम यम सूप आणि तिनेच बनवून दिलेलं नारळाच्या दुधातील कॉकटेल पीत घालवलेली थायलंडमधील पहिलीच संध्याकाळ मजेत गेली.

पुढे क्राबीतल्या शहरी, पण निवांत भागात आम्ही राहायला गेलो. सकाळी लोकांची आपापल्या कामाला जायची घाई दिसत होती. रस्त्यावर सकाळचे तात्पुरते नाश्त्याचे स्टॉल उभे होते. तशाच एका ठिकाणी जाऊन आम्ही बसलो. “हे सगळे जे खातायत, त्यातलं हवंय,” असं इशाऱ्यानेच तिथल्या माणसाला सांगितलं. ते ठिकाण अगदी स्थानिक लोकांसाठीचं असल्याने आणि पर्यटकांचा वावर त्या भागात कमी असल्याने फारसं इंग्रजी कोणाला समजत नव्हतं.

त्यामुळे हातवाऱ्यांनीच मुख्यत्वे संभाषण करत होतो. तिथे काउंटर म्हणून दोन टेबलं लावली होती. त्या बाप्याने आम्हाला दोनच मिनिटांत नाश्ता आणून दिला. एका वाडग्यात मऊ भाताचं खिमट, त्यात चिकनचे तुकडे, वर अर्धवट शिजवलेलं अंडं, किसलेलं आलं आणि कांद्याची पात. बिनतिखटाचं, पण अतिशय चविष्ट. मी लगेच त्यावर ताव मारला.

दुसऱ्या टेबलवरच्या बाईने ‘जास्मिन टी’ आणून पुढ्यात ठेवला आणि त्यासह एक ‘फ्री’ प्रसन्न स्मितहास्य दिलं. त्या दोघांनी कामं वाटून घेतली होती. तिच्या टेबलाजवळ प्रॅममध्ये एक कुक्कुलं बाळ होतं. त्याच्याकडे मध्येच लक्ष घालत जास्मिन टी बनवण्याचं तिचं काम नेटाने चालू होतं. त्याच वेळेस समोरून एम-८० सारख्या एका बाइकवरून एका प्रौढ बाईची एंट्री झाली. ती बाई तिची आई किंवा सासू असावी असं माझं अनुमान.

फुलस्लीव्हचा टी शर्ट-पॅन्ट, डोक्याभोवती हिजाब असा तिचा पेहराव. सामानाची वाहतूक करायला अजून एक चाक लावून बाजूला एक ट्रॉली तिच्या बाइकला जोडलेली होती. त्यांच्या स्टॉलसाठीचं सामान ती त्यावरून घेऊन आली होती. सगळे शांतपणे आपापली वाटून घेतलेली कामं करत होते.

अशा तऱ्हेच्या बाइक चालवणारे अनेक जण थायलंडच्या हायवेवर आम्हाला सर्रास दिसत होते आणि त्यात विशेष म्हणजे स्त्रियांचं प्रमाण जास्त होतं. त्यांपैकी बऱ्याच हिजाब घातलेल्या. थायलंडमधल्या मुख्य पर्यटन स्थळांमधल्या बाजारांत खाण्याचे स्टॉल चालवणाऱ्या किंवा समुद्रातली भटकंती आणि बाकी समुद्री खेळांचं नियोजन करून देणारी दुकानं चालवणाऱ्याही स्त्रियाच प्रामुख्याने दिसत होत्या.

एका दुपारी आम्ही समुद्रात वसवलेल्या ‘फ्लोटिंग व्हिलेज’ मध्ये गेलो. त्या गावाचं नाव होतं ‘कोह पानयी’. थायलंडच्या ‘फांग ना’ प्रांतातील ते एक गाव आहे. इंडोनेशियामधल्या जावा जमातीच्या मुस्लिमधर्मीय मच्छीमारांनी वसलेलं आणि लाकडी/लोखंडी खांबांवर बांधलेलं असल्यामुळे ते प्रसिद्ध आहे. समुद्रातल्या एका उंच दगडी बेटाच्या बाजूला वसलेल्या त्या गावात साधारण पंधराशे लोकांची वस्ती आहे.

तिथले लोक वर्षानुवर्षं मच्छीमारी करणारे आणि आता पर्यटनासंबंधीचे व्यवसाय करणारे आहेत. वेळ कमी असल्याने त्या गावात एक नुसता फेरफटका मारला. दोनशे वर्षांपूर्वी वसवलेली, समुद्राच्या मधोमध तरंगणारी ती वस्ती बघणं निराळाच अनुभव. तिथे पाऊल ठेवताच मनात एक अनामिक भीती किंवा सुन्नपणा जाणवला. एक जण चालू शकेल एवढ्याच रुंदीच्या गल्ल्या, त्यात आपण हरवलो तर...! तेवढ्यात एका गल्लीत मोत्याचे दागिने आणि इतर हस्तकलेच्या वस्तू विकणाऱ्या अनेक बायका दिसल्या.

प्रत्येकीला आपला व्यवसाय प्यारा. एकीकडून मी घेतलं. पुढे जाऊन दुसरीकडून अजून एक लहानसं उचललं. घाईत होतो, पण अगदी कमी वेळेतही जाणवलं की त्यांच्यामध्ये आकस किंवा फसवेपणा नाही. ती वस्ती मुख्य प्रदेशापासून, त्यातून येणाऱ्या चापलुसीपासून दूर वाटली म्हणून असेल कदाचित पण त्यांना एकमेकींशी गप्पा मारताना आणि हसताना बघून माझा सुन्नपणा किंवा ती बारीकशी भीती लाकडी फळ्यांच्या फटीतून दिसणाऱ्या समुद्रात पटदिशी बुडून गेली!

रोजच्या जगण्यातलं बायकांचं अखंड गप्पा मारणं, खिदळणं किंवा नुसतं सोबत असणं, त्यात तुम्ही ओळखीचे असाल किंवा नसाल. संवाद करण्यासाठी लागणारी भाषा समजो अथवा न समजो, ते शब्दांच्या अलीकडले आणि पलीकडले परस्परसंवाद जितकं त्या समाजाची, समूहाची ओळख करून देणारे असतात, तितकंच ते एकमेकांना आधार देणारे आणि सगळ्यांमध्ये एकरूप होणारे असतात. जॉन लेनन जे म्हणतो ते जग स्वप्नाळू वाटत असलं तरी अशा जगाची कल्पना जाऊ तिकडे स्थैर्य निर्माण करणाऱ्या बायांच्या विवेकाच्या जोरावर होऊ शकते एवढं नक्की!

थायलंडच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षानं दिसली ती म्हणजे एकमेकींना सांभाळून घेत लहान लहान व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया. बाळाला पाळण्यात ठेवून चहा विकणाऱ्या आईपासून एकमेकींशी खिदळत रेस्टॉरंट चालवणाऱ्या मैत्रिणींपर्यंत! जॉन लेनन त्याच्या ‘इमॅजिन’ या गाण्यात मांडतो, त्याच्या जवळ जाणारा आपलेपणाचा अनुभव मला इथे मिळाला!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.