ऋचा थत्ते rucha19feb@gmail.com
ही एक बोधकथा फार आवडते मला. वेळोवेळी जागं करते. एका आटपाट नगरीचा राजा म्हणे कशानेच खूश होत नसतो. सारखं हे हवं ते हवं.. एक मिळालं की दुसरं हवं. याच्या राजवाड्यात काम करणारा एक सेवक असतो. राजापुढे याची परिस्थिती म्हणजे अतिसामान्य, पण हा मात्र आनंदात रहायचा. हा गाणी गुणगुणत शीळ वाजवत काम करतोय असं एकदा राजाला दिसलं. प्रधानाला बोलावून घेतलं आणि सांगितलं, की हा साधा सेवक त्याने इतकं आनंदात असता कामा नये. चिंतेने ग्रासून जाईल असं काही करा. प्रधानजींना हे काही पटत नाही, पण राजाच्या आज्ञेपुढे करणार काय! आणि मग प्रधानजींच्या योजनेनुसार एक सोन्याच्या मोहरांची थैली सेवकाला भेट देण्याची व्यवस्था करण्यात येते.
आता तर खरं याने आधीपेक्षाही आनंदी असायला हवं, पण नाही. हा सदैव चिंताग्रस्त दिसू लागतो, कारण मोहरा मोजल्यावर त्या असतात नव्याण्णव. तिथेच हा चरफडतो. फक्त एक मोहर मिळाली, की शंभर होतील. ही कमतरता भरून काढण्यासाठी तो अधिक काम करू लागतो. चिंता, दगदग, थकवा, चिडचिड... या सगळ्याच गोष्टी त्याला घेरून टाकतात. का? आधी नसलेल्या नव्याण्णव मोहरा मिळाल्या आहे हे न पाहता एका मोहरेचा अभाव त्याला पोखरून टाकतो. आपलं तरी वेगळं काय होतं? ‘जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले’ असं चुकून मनात आलंच, तरी गीतातले पुढचे शब्दही पाठोपाठ येतातच ‘तरीही उरे काही उणे’ हे उणेपण (जे बहुतांशी ओढावलेलं असतं) अस्वस्थ करणारं असतं.
मध्यंतरी अशीच एक गंमत घडली, तेव्हाही अगदी हीच गोष्ट आठवली. मला अचानक एकीने पिंग करून सांगितलं, अगं ऑनलाइन आहेस तर पटकन माझी पोस्ट लाइक कर. नवशे नव्याण्णव झालेत. 1k होतील. तसेही थोड्या वेळात झालेच असते; पण हिला धीर नाही. मोहरांच्या जागी लाइक्स आले, पण कारण तेच. जाणवणारी उणीव! माणसाचं मन वागतं तसंच. आता तर काय लाइक, शेअर, सबस्क्राईब जणू आभासी आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा याच शब्दांची बरोबरी करतात. म्हणजे चांगल्या गोष्टी पोहोचण्यासाठी हे गरजेचंही असतं, पण अगदीच त्या आहारी जाऊन त्यासाठी अस्वस्थ होणं आपल्यासाठीच चांगलं नाही.
कोणताही काळ असो सामान्य माणसाचं लक्ष आधी काय नाही याकडे जातं, पण म्हणूनच काही असामान्य उदाहरणं आपल्याला प्रेरणा देतात. अंदमानात कारावासात साधा कागद आणि लेखणीही नव्हती, तर भिंतीचा कागद आणि काट्याची लेखणी करून सावरकरांनी काव्यनिर्मिती केली!
आता इतकी सगळीकडून प्रेरणा मिळत असेल, तर आपल्याला यातून नकळत मार्गदर्शन मिळतंच. मुलगा अगदी लहान असताना सगळ्याच आयांसारखा मीही ब्रेक घेतला होता. वर्ष-दीड वर्ष कार्यक्रम न करणं हे एरवी अशक्यच वाटलं असतं. क्रियाशील व्यक्तीसाठी काम आणि कलाकाराला दाद जणू ऑक्सिजन! पण मला ते शक्य झालं केवळ अशी उदाहरणं मनात ठेवल्याने. मुख्य म्हणजे लाॅकडाऊनमध्ये तरी अनेक गोष्टी ऑनलाइन करणं शक्य होतं; पण मी सांगतेय त्यावेळी सोशल मीडिआ, यूट्युब चॅनेल हे पर्याय इतके जोमात नव्हते. जवळपास बारा तास मी आणि मुलगा! पण तरीही त्यातल्या त्यात काय करता येईल? तर तो दुपारी झोपल्यावर असलेल्या वह्या पुस्तकांचा वापर करून नोट्स काढत राहिले आणि काही विषयांची थोडी पूर्वतयारी होत राहिली.
कालांतराने व्याख्यानांसाठी हा अभ्यास कामी आला. मला कल्पना आहे, प्रत्येकाची परिस्थिती आणि क्षेत्र वेगळं असतं, पण हा वेळ रिकामा नाही, तर पेरणीचा आहे असं मानलं तर नक्कीच काही छान हाती येईल. मलाही तेव्हा कधी निराश वाटायचं, पण त्याचवेळी खिडकीतून बाहेर नजर टाकल्यावर बांधकाम करणाऱ्या मजूर स्त्रिया कडेवर मूल घेऊन काम करताना दिसत. मग वाटायचं आपलं किती बरंय यापेक्षा. मनाची ही तऱ्हाही जरा विचित्र वाटली, तरी अशीच असते.
आपल्यापेक्षा कुणी अधिक त्रास भोगत असेल, तर आपल्याला लागणाऱ्या झळा या झुळूक वाटतील इतपत सुसह्य होऊ शकतात. ही सुद्धा माणसाची स्वाभाविक वृत्ती. कुठेतरी वाचलेल्या या अज्ञात कवीच्या ओळी खरोखर मनावर फुंकर घालतात.
मी चालत होतो एकटाच अनवाणी
डोळ्यात माझिया म्हणूनि आले पाणी
संपलेच रडणे परंतु जेव्हा दिसला
माणूस एकटा पायच नव्हते त्याला
किती स्पर्शून जातात हे शब्द! आधी दारिद्र्य आणि त्यामुळे कुणी जवळ न केल्याने आलेला एकटेपणा, पण त्याच्यापेक्षाही दुःखी जीव दिसताच त्याचं दुःख हलकं होतं. काही जण मात्र कुठल्याही परिस्थितीत आनंद शोधतातच.
कविवर्य मंगेश पाडगांवकरांची आठवण आहे. ज्यांना आधाराशिवाय चालताही येत नव्हतं, असे एक ओळखीचे आजोबा वाटेत भेटले. कसे आहात विचारल्यावर त्यांनी अगदी हर्षभराने सांगितलं, ‘‘काय सांगू पाडगांवकर, आज खिडकीतल्या कुंडीत फूल उमललं.’’ त्यांचा हा आनंद वेचण्याचा स्वभाव पाडगांवकरांना फार भावला आणि त्यांच्या कागदावर बोलगाणं प्रकटलं -
सांगा कसं जगायचं कण्हत कण्हत
की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!
जे आपल्या हातात नाही, त्याचं दुःख करण्यापेक्षा काय आहे त्याविषयी कृतज्ञ राहिलं, तर मानसिक ऊर्जा वाढते आणि आनंद, समृद्धी आकर्षित होतात. अगदी लहान मुलंसुद्धा आपल्याला हेच शिकवतात. एकदा एका क्लिनिकमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेळ थांबून रहावं लागलं, तेव्हा आर्य अगदी लहान होता, पण एक कागदाचा बोळा आणि एक स्ट्राॅ याच्याशी तो खेळत बसला होता.
मग तेच जोडून कधी लाॅलीपाॅप, कधी गदा, कधी बॅटबाॅल. अक्षरशः बिनपैशाची खेळणी मुलं खेळू शकतात. त्यात रमतात आणि त्यांना यातच चालनाही मिळते. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान’ या तुकोबांच्या अभंगाचा हाच तर अर्थ आहे. म्हणजे तुम्ही अल्पसंतुष्ट असावं असं नाही, पण आहे ते स्वीकारा आणि ध्येयासाठी शांत चित्ताने कार्यरत व्हा. थोडक्यात, ‘तैसेचि रहावे’ हे मन स्थिर ठेवण्यासंबंधी आहे.
आणि साध्य करण्यासाठी काही बाकी आहे, या जाणिवेमुळेच तर आयुष्य अर्थपूर्ण होतं. बकेटलिस्ट असली, की मन टवटवीत असतं, बुद्धीलाही खाद्य मिळतं. म्हणूनच कशासाठीही कासावीस न होता अपूर्णतेची गोडी आपलीशी करायला हवी.
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा!
(लेखिका प्रसिद्ध निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)