‘हम्बा, हम्बा, मी गाय आहे म्हणून नुसतं तण चघळत इकडे-तिकडे निरर्थक बघत राहावं असं कुठे आहे...’ कपिलेच्या मनात हा विचार आला! आता ही कपिला कोण? तर कपिला ही एक गाय आहे! आपण सुरुवातीला एका ‘असं का’ विचारणाऱ्या मुलाशी आपली ओळख झाली. मग दुसऱ्या लेखात ‘का का’ विचारणाऱ्या एका मुलीशी.
आज आपण भेटणार आहोत ह्या कपिला गायीला. तीसुद्धा प्रश्न विचारते. ती विचारते, ‘का नाही?’ हा प्रश्न म्हणजे ‘का?’ या प्रश्नाचा जुळा भाऊच की! ती म्हणते, ‘मी ही एक अमुक गोष्ट का नाही करायची?’, ‘मी एक गाय आहे म्हणून काय झालं? मी ही गोष्ट का नाही करू शकत?’
झालं असं की, या गायीला - म्हणजे आपल्या कपिलेला घ्यायचे होते झोपाळ्यावरून झोके! त्यासाठी ती एक फळी आणि एक दोरखंड, तिच्या सायकलच्या मागच्या कॅरियरवर अडकवून (हो हो! तिचीही एक सायकल होती!), शेतकऱ्याचा डोळा चुकवून कुरणाबाहेर पडली. ती निघाली होती ‘कावळेवना’कडे! तिथे तिचा एक मित्र राहत होता. तो म्हणजे अर्थातच कावळा!
आपण आणलेले दोरखंड झाडाच्या फांदीला बांधले, की झाला झोपाळा तयार अशी तिची कल्पना होती, पण ती काही फांदीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. हा मित्र त्यासाठी आपल्याला मदत करेल असं तिला वाटत होतं, पण कसलं काय?
कपिलेने जेव्हा झोपाळ्यावर बसून झोके घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा कावळा म्हणाला, ‘ते शक्य नाही.’ जेव्हा तिने झोपाळा बांधण्यासाठी मदत मागितली तेव्हा तो म्हणाला, ‘मी एका गायीसाठी झोपाळा बांधणार नाही.’ तिने त्याला भरपूर मस्का लावल्यानंतर व मधाळ आवाजात त्याची विनवणी केल्यावर त्याने झोपाळा बांधायला मदत केली खरी, पण तो झोपाळा काही जागचा हालेचना. मग जेव्हा कपिलेने झोका द्यायची विनंती केली तेव्हाही कावळा म्हणाला, ‘झोपाळ्यावर बसलेल्या एका गायीला मी ढकलू? शक्यच नाही. गेलीस उडत.’ घ्या!
Mamma Moo and crow या पुस्तकांच्या मालिकेतील ही कावळा आणि गायीची जोडी भन्नाटच आहे! मूळ स्वीडिश भाषेत असलेली ही पुस्तकं युज्जा आणि टॉमस विसलँडर यांनी लिहिलेली आहेत. महेश केळुसकर यांनी मराठीत अनुवाद करण्यासाठी निवडलेली गोष्ट म्हणजे ‘Mamma Moo on a Swing- कपिलेने घेतला झोका’ जी नॅशनल बुक ट्रस्टने आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत.
उत्सुक मनाची आणि कुतूहल भरल्या डोळ्यांची उत्साही खेळकर गाय आणि चार पावसाळे पाहिलेला, चांगल्या-वाईटाची समज असणारा, प्रौढपणा मिरवणारा कावळा या जोडगोळीचे अनेक धमाल किस्से या सगळ्या पुस्तकांत आहेत! स्वेन नॉर्डक्विस्ट यांनी चित्रातून उभी केलेली गाय आणि कावळा तर एवढी जिवंत वाटतात की बास! फक्त त्यांनी रेखाटलेले दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांची देहबोली जरी पाहिली तरी त्यांच्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज येतो आपल्याला!
‘कपिलेने घेतला झोका’ वाचताना वाटतं काय हा कावळा! असा कसा हा मित्र? आपल्या मैत्रिणीला पावलोपावली नाउमेद करणारा? बरं, तो काही मदत करायला फक्त नकार देत नव्हता तर मुळात कपिलेला- म्हणजे एका गायीला झोके घेण्याची इच्छा होणे हेच कसं विचित्र आणि अयोग्य आहे तेही सांगत होता! मुळात एक ‘शहाणी’ गाय असा जगावेगळा विचार करूच शकत नाही न!
शहाणी म्हणजे कशी तर कुरणात चरायची वेळ असताना ती चुकवून बाहेर न पडणारी, चरणे, खाणे, पिणे, लोळणे, मोठ्या डोळ्यांनी नुसतं पाहत राहणे, रवंथ करणे, दूध देणे यामध्येच समाधानी असणारी, स्वतःची मतं नसणारी, असली तरी ती मांडण्याची हिंमत न करणारी, सांगितलेल्या गोष्टी निमूटपणे ऐकणारी आणि हो झोपाळा वगैरे झुलण्यासारख्या कल्पनेपलीकडल्या गोष्टींचा विचारसुद्धा न करणारी!
आता या व्याख्येनुसार तर कपिला ठार वेडीच होती असं म्हणावं लागेल. कोणत्याच गायीने आतापर्यंत न केलेली गोष्ट करून बघण्याचं धाडस करणं, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी मदत मागणं, सख्ख्या मित्राने साथ द्यायला नकार दिला असतानासुद्धा हार न मानणं म्हणजे वेडेपणाच की!
पण हा खुळेपणा केला नसता, तर उंचच उंच झोके घेण्यात किती ‘मज्जा’ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गायसुद्धा झोपाळ्यावर झोके घेऊ शकते हे कळलंच नसतं न! आणि मला सांगा, कोणी कोणती स्वप्नं बघावीत याविषयीचे असे नियम थोडीच असू शकतात! स्वप्न बघण्याने अनुभवायला येणाऱ्या आनंदावर आणि मुक्तपणाच्या भावनेवर प्रत्येकाचा हक्क आहे.
कपिला अशी स्वच्छंदपणे गुणगुणत झोपाळ्यावर झोके घेत असतानाच शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरचा घुर्र…घुर्र…घुर्र… असा आवाज येऊ लागला. बापरे! कपिला तर कोणालाही न सांगता लपूनछपून कुरणातून बाहेर पडली होती. ‘आपली एक गाय जंगलातल्या झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेतेय हे दृश्य पाहिल्यावर शेतकऱ्याला झटकाच बसेल’ असं वाटून घाबरून कावळ्याने गायीला एका झाडामागे लपायला सांगितलं.
'झाडामागे लप, कपिले, तुझी शिंगं लपव, अगं ती तुझी शेपटी जरा आत ओढून घे गं!, काव! तू खूपच जाडी आहेस, कपिले!' स्वयंघोषित बॉस बनून कावळ्याने पुढची सगळी सूत्रे पटापट स्वतःकडे घेतली. कपिलेवर शेरेबाजी केली, दमदाटी केली, शेतकऱ्याचा पाठलाग करत हेरगिरी करण्याची त्याची हौसही भागवून घेतली आणि एकदाचा शेतकरी परत गेल्यावर ‘हिप हिप हुर्रे’ अशी जोरदार आरोळीसुद्धा ठोकली!
शेतकऱ्याला यशस्वीपणे चकवल्याच्या आनंदाबरोबरच ‘थोडक्यात वाचलो’ असा सुटकेचा निःश्वासदेखील दोघांनी टाकला. आता मात्र शेतकरी गायींचं दूध काढायला गोठ्याकडं निघाला असेल. आपणही गोठ्याच्या दिशेने निघायला हवं असं कपिलेच्या मनात आलं. हो मग! आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणारी होती म्हणून काही ती निष्काळजी आणि बेजबाबदार नव्हती.
तिने तिची सायकल घेतली, शेतकऱ्याची पडलेली टोपी आपल्या डोक्यावर चढवली आणि ती निघणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं - अरे झोपाळा तर उतरवायचा राहिलाच की! तेव्हा, नाराजीनेच तिला झोपाळा बांधून द्यायला मदत करणारा कावळा चक्क काय म्हणाला माहितीय? तो म्हणाला, ‘राहूदे झोपाळा! पुढे-मागे या जंगलात एखादी गाय आलीच आणि तिला झुलावंसं वाटलंच तर!’ आणि मग त्या दिवशी कपिला आनंदाने आणि समाधानाने गोठ्यात परतली!