गोडवा लातूरच्या 'अई'चा
esakal January 19, 2025 09:45 AM

- डॉ. आशा मुंडे, drashamunde@gmail.com

महाराष्ट्रात अनेक बोली बोलल्या जातात. बोली ज्या प्रदेशात बोलली जाते, त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये घेऊन उतरत असते. कोकणात कोंकणी बोली, विदर्भात वैदर्भी, वऱ्हाडी, खान्देशात अहिराणी या काही प्रमुख बोली. मराठवाड्याची बोली हीसुद्धा स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे; परंतु ती नावारूपाला आलेली नाही. या बोलीत ग्रंथसंपदा नसल्यामुळे तिची ओळख बाहेर झाली नाही.

परंतु आता या बोलीत सकस साहित्य निर्माण झाले आहे. आता ही बोली समृद्ध होत आहे. मराठवाड्यातील लातूर व धाराशीव ( पूर्वीचे उस्मानाबाद) येथील बोली मराठवाड्याच्या इतर भागापेक्षा वेगळी आहे. लातूर-धाराशीवला कर्नाटक सीमा लाभल्यामुळे आपोआपच कानडी भाषेचा प्रभाव लातूर-धाराशीवच्या बोलीवर दिसतो. कानडीप्रमाणे ‘हेल’ काढून बोलण्याची प्रवृत्ती लातूर जिल्ह्यातील बोलीत दिसते. तसेच निजामी राजवटीचा प्रभावही या बोलीवर आहे.

कानडी प्रभावामुळे नावीन्यपूर्ण संस्कृतीने नटलेला हा परिसर आहे. बोली, संस्कृती, परंपरा यांवरही कानडी संस्कृतीची छाप असलेली दिसते. लातूर-धाराशीव परिसरातील बोलीची उच्चारणे, शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, क्रियापदे, यांमध्ये भिन्नता आहे. अस्सल रांगडेपणा, गावरान गोडवा असलेली ही बोली लाघवी स्वरूपात व्यक्त होते.

लातूरच्या बोलीत ‘करलालाव’, ‘जावलालाव’, ‘येवूलालाव’ असे शब्द येतात. ‘लालावं’ असा प्रत्यय लावून बोलण्याची प्रवृत्ती दिसते. सहज बोलतानादेखील ‘का करलालाव की’ असे बोलणे असते. ते बोलणे विनोदी वाटावे अशी उच्चारणे असतात. लातूर जिल्ह्यात सर्वत्रच अशा स्वरूपाचे बोलणे असते. हेल काढून ‘असं का करलालाव म्हणतो म्या?’, ‘जावलालात का हितच बसलालात?’, अशा संवादांतून तिच्यातील नजाकत आणखीनच वाढते.

‘करतासतील’, ‘बोलतासतील’, ‘बसतातील’ यात दोन वाक्ये एकत्र करून सुलभतेने बोलली जातात. येथे राहणाऱ्या लोकांना ही बोली सहज कळते. ही उच्चारणे तशी अवघड आहेत. ‘आलाव’, ‘गेलाव’ असे सोपे करून बोलणे सगळीकडे दिसते. ही बोली सहज आणि मोकळेपणाने व्यक्त होते. साहजिकच कानाला ऐकायला मजेशीर वाटते. हीच या बोलीची गंमत आहे.

काही ठिकाणी कर्ता वाक्याच्या शेवटी वापरला जातो. उदा. ‘गावाला जाणारिस का तू?’ किंवा ‘करलालाव की मी’ अशी वाक्ये बोलली जातात. लातूरच्या बोलीत ‘अई’ हा शब्द सर्रास वापरला जातो. लहान, थोर, सुशिक्षित, अशिक्षित, शहरी, ग्रामीण, स्त्री, पुरुष प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी हा शब्द असतो. वाक्याच्या सुरुवातीला सहजपणे या शब्दाचे उच्चारण होते.

‘अई बाब्बो का झालं की!’, ‘अई आलाव का ये’, ‘अई ऐकू यिना का ये?’ अगदी कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला ‘अई’ हा शब्द येतो. आई, ताई, माई ही संबोधने अनुक्रमे अई, तई, मई अशी उच्चारली जातात. हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी या ‘तई’ या शब्दाने संपूर्ण महाराष्ट्राला हसवले आहे.

या शब्दाप्रमाणे ग्रामीण भागातील व्यक्तीच्या तोंडी वाक्याच्या शेवटी ‘ये’ हा शब्द येतो. का ते मला अजूनही कळत नाही, परंतु ‘ये’ शब्दाने त्या वाक्यातील अर्थच बदलून जातो. खेड्यामधली एखादी आजी, आई आपल्या नातीला, मुलीला ‘माय जेवलालीस का ये?’ किंवा ‘माय तुज तोंड का बारीक झालंय ये?’ अशा प्रेमळ स्वरात विचारते, तेव्हा या बोलीतला गोडवा ‘ये’ शब्दामुळे आणखी वाढतो.

उदगीर परिसरात फिरताना ‘नकर’ हा शब्द बऱ्याचदा कानावर पडतो. लातूरमध्ये नवीन आलेल्या माणसाला ‘नकर’ शब्द समजणे शक्यच नाही. लक्षपूर्वक ऐकल्यावर वाक्यातील संदर्भाने याचा अर्थ थोडाफार लक्षात येतो. ‘नकर’ म्हणजे ‘थोडंसं’ पण बोलताना ऐकण्याची गंमत वेगळीच असते. खरं तर लातूरची बोली मवाळ, लाघवी आहे. उदा. ‘नकर दे माय’, ‘नकर आल्ते व’, ‘नकर खंदाव म्हणलं’, अशा ढंगात हा शब्द बऱ्याच संदर्भाने व्यक्त होतो. ग्रामीण भागातील स्त्रिया बोलताना सुरुवातीला किंवा शेवटी ‘माय’ हा शब्द उच्चारतात, त्यातून माया, प्रेम मधाळपणा जाणवतो.

एका लग्नसमारंभाला मी गेले होते. तिथे स्पीकरवर एक व्यक्ती बोलत होती. ‘पुरवांनो जल्दी या’! ‘पुरवांनो’ म्हणजे ‘पोरींनो लवकर या’. इथे राहणाऱ्या माणसाला यातील विनोद जाणवत नाही, परंतु नवीन ऐकणाऱ्या व्यक्तीला ही उच्चारणे मजेशीर वाटतात. लातूरमध्ये सहज व्यक्त होणारे शब्द म्हणजे ‘त्यनं’, ‘तिनं’ आणि ‘त्यंनी’ हे आहेत.

हे शब्द उच्चारल्यानंतर त्यातला वेगळेपणा दिसतो. ‘त्यनं आला का?’ (तो आला का?) ‘तिनं जेवली का?’ (ती जेवली का?) ‘त्यनी का मारलालते?’ (ते का मारत होते?) या वाक्यांमध्ये तो, ती, ते असे बोलले जात नाही. सहज बोलतानाही ‘त्यनं आला का?’ असेच बोलणे होते. ही वेगळी उच्चारणे या बोलीत दिसतात.

‘तू कसा आलास?’ या प्रश्नाचे उत्तर प्रामुख्याने औश्यातील माणूस ‘आयनासच’ असे देईल! बाहेरून आलेल्या माणसाला हा ‘आयनास’ कळत नाही. ‘आयनास आलावच तर काम करून जावं म्हंतो’ या संदर्भातून ‘आयनास’ म्हणजे ‘अनायसे’ हा अर्थ लागतो. औसा परिसरात बोलला जाणारा ‘बोगानं’ हा शब्द असाच वेगळा आहे. बाहेरचा माणूस अर्थ सांगू शकत नाही. ‘पातेलं’ या शब्दासाठी हा ‘बोगानं’ शब्द वापरला जातो. बहुतेक ‘भगून’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘बोगानं’ शब्द बनला असावा. उच्चारण सुलभतेने व्हावे म्हणून असे शब्दप्रयोग होतात.

‘हेंडगा’ हा शब्द जाळ, आग या अर्थाने वापरला जातो. ‘हेंडगा पेटवला का?’ अशा वाच्यार्थापासून ते ‘त्याच्या तोंडाला हेंडगा लावला’ अशा लाक्षणिक अर्थाने बऱ्याच ठिकाणी हा शब्द वापरला जातो. बेंदाड (चिखल), इक्रामाळ (अस्ताव्यस्त), पिळगं (लहान मूल), कुडवे (लहान वेळूची टोपली), किटान (खोटा आरोप, आळ), आबदक्या (अचानक), केंडा (गोवरीचा विस्तव), आम गड्या (आळस देणे), जुवाटा (एकोप्याने मिळून काम करणे), लोंदज्या (लक्तरे), हिकात्या (खोटे कारण), वारगी (समन्वयक), बंडाळ (तारांबळ), भोंबाळ (कर्जबाजारी), केंगा (गोंधळ), ऊरपांडून (उसळून) असे शब्द वापरले जातात.

लातूर, धाराशीव जिल्ह्यात ‘येळवस’ म्हणजेच दर्शवेळा अमावस्या फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. या सणामधून अनेक शब्द लातूरच्या बोलीत येतात. त्यामध्ये ‘बिंदग’, ‘भज्जी’, ‘आंबील’, ‘कोंदीची भाकर’ हे काही शब्द लातूरच्या बोलीत आले आहेत. ‘भज्जी’ म्हणजे ‘मिश्र भाजी’, ‘बिंदग’ म्हणजे गाडगे, ‘कोंदीची भाकर’ म्हणजे शेंगदाण्याची पोळी. नवीन माणसाला ‘भज्जी’ म्हणजे ‘भजी’ वाटतात, पण लातूरमध्ये मात्र ‘भज्जी’ म्हणजे येळवसमध्ये केली जाणारी मिश्र भाजी असा अर्थ घेतला जातो.

लातूर जिल्हा बीड जिल्ह्याला चिकटून आहे. तरीपण लातूरपासून अगदी पन्नास पंचावन्न किलोमीटरवर असलेल्या अंबाजोगाई येथील बोली लातूरच्या बोलीहून खूप भिन्न आहे. मराठवाड्यात इतर ठिकाणी जशी बोली आहे, तशी बोली अंबाजोगाईची आहे. अंबाजोगाईची बोली प्रमाणभाषेच्या जवळ जाणारी नसली, तरी मराठी माणसाला सहज समजेल अशी ही बोली आहे. लातूरच्या बोलीत मात्र शब्दांची उच्चारणे, वाक्यरचनेमध्ये भिन्नता असलेली दिसते. या बोलीविषयी आणखी थोडे, पुढच्या अंकात.

कानडी प्रभावामुळे नावीन्यपूर्ण संस्कृतीने नटलेला लातूर-धाराशिवचा परिसर आहे. बोली, संस्कृती, परंपरा यावरही कानडी संस्कृतीची छाप असलेली दिसते. लातूर-धाराशीव परिसरातील बोलीची उच्चारणे, शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, क्रियापदे यामध्ये भिन्नता आहे. अस्सल रांगडेपणा, गावरान गोडवा असलेली ही बोली लाघवी स्वरूपात व्यक्त होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.