Maharashtra Politics : हलक्या कानाचे राहू नका : सुनील तटकरे
esakal January 19, 2025 09:45 AM

शिर्डी : भारतीय जनता पक्षाने सन्मान केला. विधानसभेसाठी पुरेशा जागा सोडल्या. मात्र जे पक्ष नेतृत्वाला सोडतात, ते पुन्हा निवडून येत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर आमचे काही खरे नाही, अशी टिका आमच्यावर करण्यात आली. तरीही आपले विरोधक शांत बसणार नाहीत. हे लक्षात घेऊन हलक्या कानाचे राहू नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्वपक्षाच्या लोकप्रतिनीधींना दिला.

ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पक्षाचे चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न झाले. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले.’’

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकावून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसांच्या शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिराच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, दत्तात्रेय भरणे यांच्यासह पक्षाचे आजी माजी आमदार व मंत्री उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, ‘‘सदस्य नोंदणीत आघाडी घेऊन पक्षाचा विस्तार करायचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात देखील मोठे यश संपादन करायचे आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरून आपल्या पक्षाला वाटचाल करायची आहे. पक्षाच्या स्थापनेपासून आपण सत्तेत आहोत. आता पुन्हा सत्तेवर आलो आहोत. राष्ट्रीय पातळीवर देखील आपल्याला विस्तार करायचा आहे.’’

‘‘विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशामुळे सर्वांचाच उत्साह वाढला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बराच काळ आपण सर्वजण मोठ्या ताणतणावाखाली होतो. आता हा तणाव दूर झाला आहे. दोन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते.

त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींची मोठी साथ मिळाली. अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवर टिका करणाऱ्यांना या बहिणींनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले,’’ असे ते म्हणाले.

सतीश चव्हाण परतणार...

‘घड्याळ तेच, वेळ नवी आणि अजित पर्व दिशा विकासाची -पुरोगामी विचारांची,’ अशी टॅगलाइन घेऊन या शिबीरास प्रारंभ झाला. विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज शिबिरास हजेरी लावली. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यांची आमदारकी रद्द करावी, असा अर्ज राष्ट्रवादी काँग्रसने सभापतींकडे दिला होता. हा अर्ज मागे घेतल्याने चव्हाण यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सदस्य नोंदणीस प्रारंभ

आज व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिला सदस्य नोंदणी फार्म भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला. या दोन दिवसीय शिबीर स्थळाला कै.यशवंतराव चव्हाण नगरी असे नाव देण्यात आले. वादाच्या भोवऱ्यात सापडेले मंत्री धनंजय मुंडे आज शिबीराच्या उद्घाटन सत्र संपेपर्यत शिबीरास गैरहजर होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.