Maharashtra Government : मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे पालक; अजित पवार बीड, पुण्याचे पालकमंत्री तर मुंबई, ठाणे एकनाथ शिंदेंकडे
esakal January 19, 2025 09:45 PM

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन तब्बल ४५ दिवसांनी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला आज अखेरीस मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनले असून बीड आणि पुण्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर अन् ठाण्याचे पालकमंत्री असतील. धनंजय मुंडे यांना अखेर डच्चू मिळाला असून त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. पालकमंत्रिपदे राखण्यातही भाजपने बाजी मारल्याचे दिसते. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यांची मनसबदारी मिळाली आहे.

आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवले आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यासोबतच मुंबई शहराचे ठाणेदार झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे त्याचबरोबर गेले काही दिवस तणावग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याने महायुतीने सहमतीने मुंडे बंधू भगिनीला जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे बोलले जाते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही तर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.

भाजपला गडचिरोली, नागपूर, अमरावती, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, पालघर, मुंबई उपनगर, धुळे, जालना, नांदेड, चंद्रपूर, लातूर, सोलापूर, भंडारा, बुलडाणा, सिंधुदुर्ग, अकोला, गोंदिया, वर्धा आणि परभणी अशा २१ तर शिवसेनेला नऊ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. यात ठाणे, मुंबई शहर, जळगाव, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सात जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे यात पुणे, बीड, वाशीम, रायगड, हिंगोली, बुलडाणा आणि गोंदिया यांचा समावेश आहे.

मुंडे, गोगावलेंना डच्चू

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दीड महिना लोटला तरी जिल्ह्यांना पालकमंत्री जाहीर करण्यात आले नव्हते. मुंबई, बीड, रायगड, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच झाली. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबरच मंत्री भरत गोगोवले यांनाही कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही.

जयस्वाल सहपालकमंत्री

नवीन वर्षाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमधून केली होती. त्याचवेळी फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मागील सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले होते. गडचिरोलीचे सहपालकमंत्री म्हणून राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेवर डोळा

मुंबई शहराचे पालकमंत्रिपद मागच्या सरकारमध्ये शिवसेनेकडेच होते. आताही ते शिवसेनेने स्वतःकडेच ठेवले आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदेंनीच ठाण्यासोबतच मुंबईचे देखील ठाणेदार होण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर मात्र भाजपकडे गेले असून उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रसाद लोढा असतील. अपेक्षेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे आले आहे. मागच्या सरकारमध्ये पुण्याचे पालकमंत्री असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले आहे.

म्हणून अजित पवारांचा पुढाकार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे वादात असल्याने त्यांना बीडच्या पालकमंत्रिपदापासून अजित पवारांनी दूरच ठेवले आहे,

त्याचबरोबर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना देखील भाजपने बीडचे पालकमंत्रिपद न देता जालन्याचे पालकमंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून तणाव निर्माण झाल्याने बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी स्वीकारले आहे.

मुश्रीफांना मिळाले वाशीम

कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची निवड झाली असून सहपालकमंत्री म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी जोर लावला होता मात्र त्यांना वाशीमचे पालकत्व देण्यात आले आहे.

पक्षनिहाय पालकमंत्री

३७ एकूण जिल्हे

  • २१ भाजप

  • ७ राष्ट्रवादी काँग्रेस

  • ९ शिवसेना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.