Beed Gaurdianship given to ajit pawar Dhananjay Munde first reaction
Marathi January 20, 2025 01:24 AM


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. अशामध्ये बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर महायुतीमधील अनेक नेत्यांनी त्यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अशामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया ट्विट करत दिली. (Beed Gaurdianship given to ajit pawar Dhananjay Munde first reaction)

हेही वाचा : Raigad : गोगावलेंना डावलले, आदिती तटकरेंकडे रायगडचे पालकमंत्रिपद 

मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, “बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिकअभिनंदन आणि स्वागत. त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले. तसेच, ते पुढे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय आणि सामाजिक परीस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.” असे ते म्हणाले.

“सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार. मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.” असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर बीडमधील सध्याचे वातावरण पाहता काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता पुणे जिल्ह्यासह बीडचेदेखील पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.