गावातील अस्वच्छतेमुळे रेवदंडावासी त्रस्त
esakal January 20, 2025 01:45 AM

गावातील अस्वच्छतेमुळे रेवदंडावासी त्रस्त
हरेश्वर मैदान मार्गावर सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
रेवदंडा, ता. १९ (बातमीदार) ः सध्या वाढते शहरीकरण, मुंबईला हाकेच्या अंतरावर असलेले ठिकाण यामुळे पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्यात येते, मात्र स्थानिक ग्राम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. अस्वच्छतेमुळे स्मार्ट सिटी हे फक्त स्वप्नच राहिले असल्यचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
विस्तीर्ण शांत, सुरक्षित समुद्रकिनारा, नारळी-पोफळींच्या बागा, जिल्ह्याचे व अलिबाग शहरापासून दक्षिण टोकाला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंडा वसलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्या वाढली आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ते, डम्पिंग ग्राउंड असताना काही ठिकाणी तयार झालेल्या कचऱ्याकुंड्या, टुमदार कौलारू घरांऐवजी उभ्या राहिलेल्या इमारती, सांडपाण्याच्या निचऱ्याची अयोग्य व्यवस्था यामुळे शहर अस्वच्छ झाले आहे. विकासात अडथळे जाणवत आहेत. त्यामुळे रेवदंडा स्मार्ट सिटी बनणे स्वप्नच राहील की काय, असा सवाल निर्माण होत आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या, मुंबईला जवळ असल्याने सेकंड होमची दिलेली पसंती, जुन्या छपरांच्या घरांनी तीन-चार मजल्यांची घेतलेली जागा पाहता अंतर्गत रस्त्यांवर येत असलेले सांडपाणी निचरा होण्यासाठी सुयोग्य योजना हवी, अशी मागणी गेली कित्येक वर्षे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नागरिकांनी केली आहे. मागील वर्षी अखेरीला सांडपाणी हा मुद्दा गाजला होता. त्यावर सांडपाणी निचऱ्यासाठी भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव पाठवावा, असे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी सभागृहाला सुचवले होते. त्या वेळी सभेचे अध्यक्ष सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल, असे सांगितले होते, तसेच ज्या गृह संकुलातून सांडपाणी अंतर्गत रस्त्यांवर येत असेल, त्यांना ग्रामपंचायतीकडून तंबी दिली जाईल, अथावा दंड आकारला जाईल, अशी हमी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात हरेश्र्वर मैदान मार्गावर व समुद्रकिनारी भागात रस्त्यावर सांडपाणी आल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.