MPPSC Results 2022 : बापाने आयुष्यभर रिक्षा चालवली. पै पै जमवून संसाराचा गाडा हाकतानाच मुलांना शिक्षण दिलं. मुलीच्या शिक्षणातही हायगय केली नाही. पोरगीही तशीच निघाली. बापाच्या मेहनतीला फळ यावं म्हणून तिनेही जीव तोडून मेहनत केली. अन् अखेर ती एमपी लोकसेवा आयोग (MPPSC) परीक्षा 2022मध्ये पास झालीय. रिक्षा चालकाची मुलगी आयशा अन्सारी रीवाचा मान वाढवला आहे. या परीक्षेत पास होऊन आयशा अन्सारी आता डेप्युटी कलेक्टर झाली आहे. त्यामुळे आयशाच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. नातेवाईकच नव्हे तर अख्खं गावच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. बाप रिक्षा चालवायचा, आता पोरगी अख्खा जिल्हा चालवणार असल्याने अनेकांना अभिमान वाटत आहे.
आपल्या काळजाचा तुकडा आयशा पास झाल्याने तिच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिचे आईवडील प्रचंड खूश आहेत. आयशाचे वडील म्हणतात, आयशा सतत अभ्यास करायची. त्यामुळे आम्ही तिला कधीच रोखलं नाही. तिला अभ्यास करू दिला. उलट आम्ही तिला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. तिनेही कठोर मेहनत केली आणि अखेर यश मिळवलं.
वडिलांचा संदेश
मोहल्ल्यातील एका शाळेतून आयशाने शिकण्यास सुरुवात केली. आज ती जी काही झाली आहे, ती सर्व तिची मेहनत आहे. आम्ही काहीच केलं नाही. तिने आमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. कोणताही हट्ट धरला नाही. जर तुमचं मुल शिकत असेल तर त्याला शिकू द्या. त्याच्या पाठी उभं राहा. एक दिवस नक्कीच त्याच्या मेहनतीला फळ येईल, असं तिच्या वडिलांनी सांगितलं.
वडिलांचं स्वप्न साकार
आयशा अन्सारीही मध्यमवर्गातून येते. तिचे वडील ऑटो रिक्षा चालक आहेत. आई रुक्साना गृहिणी आहे. आपल्या कुटुंबातील कोणी तरी प्रशासकीय अधिकारी बनावं असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. आयशाने हे स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. आयशाने रीवाच्या एका खासगी शाळेतून शिकण्यास सुरुवात केली होती. रीवातीलच मॉडेल सायन्स कॉलेजातून तिने पदवी घेतलीय.
आईवडिलांना श्रेय
आयशाने तिच्या यशाचं श्रेय तिच्या आईवडिलांना दिलं आहे. माझ्या आईवडिलांनी सहकार्य केलं नसतं तर आज हे शक्यच झालं नसतं. मी सेल्फ स्टडी करून यश मिळवलं आहे. माझे वडील माझ्यासाठी वडीलच नाही तर ते गुरू आणि मार्गदर्शकही आहेत, असंही तिने सांगितलं.
छोट्या शहरातील मुलींना चूल आणि मुलीपर्यंत मर्यादित ठेवलं जातं. पण माझ्या आईवडिलांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं. घरकाम तर कोणीही करू शकतं. पण प्रशासकीय सेवेत सर्वच जात नाही, असं ते सांगायचे. माझं डेप्युटी कलेक्टर होणं हा त्याचाच परिणाम आहे, असंही तिने सांगितलं.