आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी 18 जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऋषभ पंत याची बॅकअप विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर आता ऋषभ पंत याला सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतची लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतची केएल राहुल याच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
केएल राहुल गेल्या 3 हंगामापासून लखनौ सुपर जायंट्सचं नेतृत्व करत होता. मात्र आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी केएलला करारमुक्त करण्यात आलं. त्यानंतर पंतला लखनौने मेगा ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं. लखनौने पंतसाठी तब्बल 27 कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर आता पंतकडे लखनौच्या कर्णधारपदाची सूत्र सोपवण्यात आली आहेत. पंत यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा कर्णधारही ठरला आहे.
ऋषभ पंतला नेतृत्वाचा पर्याप्त अनुभव आहे. पंतने 2021 साली दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं. मात्र 2024 नंतर दिल्ली आणि पंत या दोघांची वाट वेगळी झाली. त्यामुळे आता पंतसमोर आयपीएलच्या 18 व्या मोसमात लखनौला चॅम्पियन करण्याचं आव्हान असणार आहे. पंत या आव्हानाला कस उत्तर देतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी पंतला कर्णधार करत परंपरा कायम ठेलली आहे. ऋषभ पंत संजीव गोयंका यांच्या फ्रँचायजीचं नेतृत्व करणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. पंतआधी केएल राहुल याने ही जबाबदारी पार पाडली आहे. तर त्याआधी महेंद्रसिंह धोनी याने रायसिंग पुणे सुपरजायंट्सचं कर्णधारपद सांभाळलं होतं
आयपीएल 2025 साठी लखनौ सुपर जायंट्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), निकोलस पूरन, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, डेव्हिड मिलर, एडनग मारक्रम, मिचेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंह, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, शेमार जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्जके, हिम्मत सिंह, एम सिद्धार्थ आणि दिग्वेश सिंह.