नांदेड – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आगामी निवडणुकीत महायुती राहणार नाही, असे संकेत पक्षाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नांदेड येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत खासदार अशोक चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाचा विचार कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन केले आहे. खासदार चव्हाणांच्या या आवाहनामुळे आगामी निवडणुकीत महायुती राहणार नाही, हे त्यांनी थेटच सांगतले आहे.
अशोक चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नांदेड शहर आणि जिल्ह्यात आपली ताकद आहे. जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीची (अजित पवार) ताकद असली तरी, आपल्याला भाजपची ताकद वाढवायची आहे. आगामी काळात आपल्याला प्रत्येक क्षणाला तयार राहायचे आहे. आपल्याला घटक पक्षांविरोधात बोलायचे नाही. मात्र आपला पक्ष मोठा करण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपली ताकद आहेच, ती अधिक वाढवायची आहे.
राज्यात आपले आमदार जास्त आहेत, म्हणून आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे सहाजिकच आपला पक्ष मोठा आहे. आपला पक्ष वाढला तर सर्वच राहणार आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. आगामी काळात जी काही परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपचे नुकतेच शिर्डीत अधिवेशन झाले, त्यानंतर 18 आणि 19 जानेवारीला शिर्डीमध्येच राष्ट्रवादीचे अधिवेशन झाले. या दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपसोबत राष्ट्रवादीही स्वबळावर ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी पुन्हा महायुती करण्याचे संकेतही नेत्यांनी दिले आहेत.