टीम इंडिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंड विरुद्ध मायदेशात टी 20I आणि वनडे सीरिज खेळणार आहे.टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर टी 20I मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका फार निर्णायक आहे. त्याआधी टीम इंडियाच्या वनडे सीरिजमधील 3 खेळाडू हे एक सामना खेळणार आहेत. त्या एकमेव सामन्यासाठी निवड समितीने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
विजय हजारे ट्रॉफीनंतर आता रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मुंबई जम्मू काश्मिरविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट निवड समितीने संघ जाहीर केला आहे. त्यानुसार अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा कर्णधारपद देण्यात आलं आहे. रहाणे मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध वनडे सीरिजमध्ये असलेल्या रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जयस्वाल या तिघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित आणि यशस्वी या दोघांचं देशांतर्गत क्रिकेटमध्ये यासह पुनरागमन झालं आहे.
तसेच मुंबई संघात शिवम दुबे आणि शार्दूल ठाकुर या कॅप्ड खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच वसईकर आयुष म्हात्रे व्यतिरिक्त सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, तनुष कोटीयन, शम्स मुलानी या स्टार खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
दरम्यान उभयसंघातील हा सामना 23 ते 26 जानेवारी दरम्यान मुंबईतील बीकेसी येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट अकादमीत खेळवण्यात येणार आहे.
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानी
जम्मू काश्मिर विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर,सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर),आकाश आनंद (विकेटकीपर), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, हिमांशु सिंग, शार्दूल ठाकुर, मोहित अवस्थी, सिलवेस्टर डीसोझा, रॉयस्टर डायस आणि कर्श कोठारी.