भारत-इटलीने घेतला निर्णय : द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि इटलीने दहशतवाद विरोधातील सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यात दहशतवादी कारवायांसाठी तंत्रज्ञानाच्या गैरवापराला प्रभावीपणे रोखणे देखील सामील आहे. इटलीची राजधानी रोम येथे दहशतवाद आणि संघटित गुन्ह्यांच्या विरोधातील भारत-इटली संयुक्त कार्यसमुहाच्या (जेडब्ल्यूजी) बैठकीत दहशतवाद विरोधातील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या पद्धतींवर व्यापक विचारविनिमय करण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने रविवारी दिली.
दोन्ही देशांनी देशांतर्गत, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी धोक्यांवर चर्चा केली. तसेच दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीच्या विरोधात सहकार्याच्या अनेक क्षेत्रांवर विचारांचे आदान-प्रदान केले. दहशतवादी उद्देशांसाठी तंत्रज्ञानाच्या गैरवापराला रोखण्यासाठी सहकार्य वाढविण्याच्या आवश्यकतेला स्वीकारत दोन्ही देशांनी हा धोका रोखण्याचे आणि कमी करण्याचे अनुभव मांडले आहेत.
बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्याची प्रतिबद्धता
भारत आणि इटलीने दहशतवादी कृत्यांसाठी जबाबदार लोकांच्या विरोधात प्रभावी कारवाईच्या महत्त्वावरही जोर दिला. चर्चेत दोन्ही रणनीतिक भागीदारांनी संयुक्त राष्ट्रसंघ, जीसीटीएफ (जागतिक दहशतवाद प्रतिबंधक मंच) आणि एफएटीएफ समवेत बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य मजबूत करण्याच्या स्वत:च्या प्रतिबद्धतेची पुष्टी दिली. दोन्ही देशांनी अनेक द्विपक्षीय करारांवर सुरू असलेल्या चर्चेला पुढे नेण्याच्या पद्धती तसेच साधनांवरही चर्चा केल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
कायदा अंमलबजावणी यंत्रणांची क्षमतावृद्धी
या बैठकीचे सह-अध्यक्षत्व विदेश मंत्रालयातील दहशतवाद विरोधी विभागाचे संयुक्त सचिव के. डी. देवल आणि इटालियन विदेश मंत्रालयातील वरिष्ठ उपसंचालक तसेच सुरक्षा संचालक एलेसेंड्रो अजोनी यांनी केले. भारतीय शिष्टमंडळाने कॅसर्टामध्ये इटलीच्या आंतर-एजेन्सी कायदा अंमलबजावणी अकॅडमीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि अकॅडमी आणि भारतात याच्या समकक्ष संघटनेदरम्यान क्षमतानिर्मिती उपायांना मजबूत करण्यावरही चर्चा केली आहे.