ढिंग टांग
आजचा दिवस : क्रोधी नाम संवत्सर श्रीशके १९४ पौष कृष्ण षष्ठी.
आजचा वार : मंडेवार
आजचा सुविचार : महाराष्ट्र हे देशाचे ‘पॉवर हाऊस’ आहे!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मजल दरमजल करीत अखेर आज सकाळी दावोस येथे पोचलो. आसपास कुठेही बघितले की बर्फराजीने विनटलेली आल्प्स पर्वतरांगांची शिखरे दिसतात. स्वित्झर्लंडमध्ये थंडी खूप आहे. पण मला चिंता नाही. माझ्याकडे चांगली चार-पाच नमोजाकिटे आहेत. नागपूरच्या माणसाला दावोसच्या थंडीची भीती नसते. कारण या गावात पैशाची ऊब फार!! जो भेटेल तो बिलियन, ट्रिलियनचीच भाषा बोलतो. नुसते आकडे ऐकून कानशिले तापतात. उकडू लागते. पण मीदेखील पूर्ण तयारीनेच आलो आहे.
झुरीख (की झुरीच की झुरीक? जे काही असेल ते-) मध्ये आलो, तेव्हा येथे राहणाऱ्या मराठी मंडळींनी माझे भरघोस स्वागत केले. काही लाडक्या बहिणींनी माझ्यासमोर लेझिम खेळून दाखवला. मला फार कौतुक वाटले. या स्विस-मराठी लोकांनी अजूनही आपले मराठीपण किती छान टिकवले आहे! एका चिमुकल्याने माझ्यासमोर ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे अमिताभ बच्चनजींपेक्षाही चांगले म्हणून दाखवले. पण ते म्हणण्यापूर्वी तो चिमुरडा म्हणाला की, ‘मी पुन्हा येईन असे तुम्ही म्हणाला होता, आणि खरंच पुन्हा आलात!’’
त्याचा गालगुच्चा घेत मी म्हणालो, ‘‘हो क्का? लब्बाडा!’’
त्याच्यापुढे मात्र तो चिमुकला म्हणाला त्यामुळे मी आतून अगदी हललो. तो म्हणाला, ‘‘असेच पुन्हा पुन्हा या!’’
मी विव्हळल्यासारखे हसलो. मनात म्हणालो, ‘अरे अजाण बालका! मी एकदाच पुन्हा आलो तर येवढा झांगडगुत्ता झाला, पुन्हा पुन्हा आलो तर काय व्हईल? माझ्या छोट्याश्या मित्रा, तुझ्या या भावना महाराष्ट्रातील काही लोकांना कळल्या तर?..’
…पुन्हा पुन्हा येण्याचा विचार मी झटकला आणि सगळ्यांचे आभार मानून दावोसला रवाना झालो. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊसला खरीखुरी पॉवर मिळाली, तर देशाची अर्थव्यवस्था आपोआप उजळून निघेल, याच विचारावर आधारित मी माझे मार्केटिंग सुरु केले आहे.
काहीही झाले तरी सात-आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करुन मगच परतायचे, असा मी चंग बांधला आहे. तातडीने श्रीमंत होण्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. त्याशिवाय तरणोपायच नाही. साताठ-दहा लाख कोटींचे करार केले की त्यातले निम्मे तरी येत्या शंभर दिवसात कार्यान्वित करायचे, आणि राज्याची तिजोरी भराभर भरुन टाकायची, असा माझा प्लॅन आहे.
करारांवर स्वाक्षऱ्या करताना ऐनवेळी गडबड नको म्हणून चांगली दोन डझन पेनं घेऊन आलो आहे. माझ्या नमो जाकिटाला चार खिसे आहेत, चारही खिशात पेने आणि रिफिल भरलेल्या अवस्थेत आहेत.
दावोसला आल्यावर मी पहिला फोन आमचे ठाण्याचे मित्र कर्मवीर भाईसाहेबांना केला. त्यांना म्हणालो, ‘‘मी दावोसला पोचलो बरं का!’’
‘‘तुम्ही तिकडे दावोसला, आणि मी इथे दऱ्याला पोचलो!’’ ते म्हणाले. मला काय बोलावे कळत नाही. माझ्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार तुम्ही पाहात चला, असे मी त्यांना सांगून आलो होतो. पण माझी पाठ वळताच गृहस्थ दरेगावात पोचले. दुसरा फोन बारामतीच्या दादासाहेबांना केला, तर ते बारामतीत पोचले होते!! बीडलासुध्दा गेले नाहीत!! आता काय म्हणायचे याला? अशाने कसा होणार माझा महाराष्ट्र देशाचे पॉवर हाऊस? हाच खरा ट्रिलियन डॉलर सवाल आहे.