नाश्त्याची आवश्यकता
esakal January 21, 2025 12:45 PM

तुमचे एकंदर आरोग्य उत्तम राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा आणि त्यांचा दर्जा अतिशय आवश्यक असतो. सकाळचा नाश्ता हा वरवर किरकोळ वाटणारा घटक असला, तरी तो अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक जण नाश्ता करणं टाळतात. मात्र तो का गरजेचा आहे, ते आपण बघूया.

पचनरसांचा योग्य वापर

आपल्या शरीरात सकाळच्या वेळी पचनासाठी आवश्यक रस स्रवत असतात. तुमच्या झोपण्याच्या-उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्या, तरी शरीराचं ‘जैविक घड्याळ’ योग्य पद्धतीनं काम करत असतं. सकाळच्या वेळी हे पचनासाठीचे रस स्रवत असताना अनेक जण चहा, कॉफीसारखी पेये पिऊन त्या रसांवर चुकीचा परिणाम करत असतात. त्यामुळेच अनेकांना ॲसिडिचीचा त्रास होत असतो. जेव्हा शरीरात पचनप्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असते, तेव्हा आपण तिच्यासाठी ‘खाऊ’ दिला पाहिजे. त्यामुळे त्या अन्नाचे पचन अगदी लवकर होते आणि संपूर्ण शरीरापर्यंत त्यातून योग्य घटक पोचवले जातात आणि पोषण व्यवस्थित होते.

ॲसिडिटीवर नियंत्रण

अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो, कारण सकाळी लवकर आणि वेळेवर खाल्ले जात नाही. सकाळी उठल्यानंतर थेट दुपारी जेवण केले जाते. खूप काळ पोटात पचनरस तसेच राहिल्यानं त्यांचा उलटा परिणाम होऊन डोकेदुखी, मळमळ, पोट दुखणे आणि इतर त्रास होतात. ते टाळण्यासाठी सकाळी परिपूर्ण आणि पुरेसा नाश्ता केला पाहिजे.

ऊर्जा

सकाळचा नाश्ता चांगला केल्यास त्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी योग्य राहते आणि दिवसभर ऊर्जादायी वाटते.

वजन नियंत्रण

सकाळी पुरेसा आहार घेतला, तर त्याचा वजनावरसुद्धा फायदा होतो. तुमची भूक भागली जाते, त्यामुळे दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणात अतिखाणे टाळले जाते.

कोलेस्टेरॉलची पातळी

सकाळच्या नाश्त्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. नाश्त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहून हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

एकाग्रता, स्मरणशक्ती

जे नाश्ता व्यवस्थित करत नाहीत, त्यांची शाळा-कॉलेजेस किंवा ऑफिसेस सकाळी असली, तर भुकेमुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो, असे अभ्यासांमधून आढळले आहे. त्यामुळे नाश्ता नक्की करावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.