अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी आज विशेष विमानाने बेळगावत दाखल होणार आहेत.
बेळगाव : येथील सीपीएड् मैदानावर मंगळवारी (ता. २१) आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाची (Congress Session) जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ या घोष वाक्याखाली अभियानाचा प्रारंभही करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात नेत्यांचे फलक लावण्यात आले आहे. अधिवेशनासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.
या अधिवेशनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते (Rahul Gandhi), खासदार प्रियंका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी १०:३० वाजता सुवर्ण विधानसौध येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर दुपारी १२ वाजता सीपीएड् मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
महात्मा गांधीजी (Mahatma Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात १९२४ मध्ये काँग्रेसचे अधिवेशन ऐतिहासिक झाले होते. या अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बेळगावात काँग्रेसकडून या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन गेल्या डिसेंबरमध्ये २६ व २७ रोजी आयोजित करण्यात आले होते. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हे अधिवेशन रद्द करून पुढे ढकलण्यात आले होते. शताब्दी काँग्रेस अधिवेशन मंगळवारी (ता. २१) सीपीएड् मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला राज्यभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. जवळपास पाच लाखांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील ६० पेक्षा अधिक नेते हजर राहणार आहेत. यामध्ये काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांसह विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.
मिलिटरी फार्म येथे पार्किंगकॅम्प परिसरातील मिलिटरी फार्म येथे कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मैदानावर उभारण्यात आलेल्या शामियानाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रवेशव्दारामध्ये अनेक मेटल डिटेक्टर यंत्रणा उभारण्यात आली आहे.
सुवर्ण विधानसौध येथे गांधी पुतळा अनावरणअधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी मंगळवारी (ता. २१) विशेष विमानाने बेळगावत दाखल होणार आहेत. यानंतर ते सुवर्ण विधानसौध आवारामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे. नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
बेळगाव शहर, तालुक्यांतील शाळांना आज सुटीबेळगाव : सुवर्ण विधानसौध परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (ता. २१) होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह लाखो लोक येणार आहेत. त्यामुळे शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये, यासाठी बेळगाव शहर आणि तालुक्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसह अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. सकाळी साडेदहा वाजता सुवर्णसौध येथे पुतळ्याचे अनावरण होणार असून यासाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे.