सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सध्या सत्र परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील सुमारे ७२ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पण, संपूर्ण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाने केवळ तीन भरारी पथके नेमली असून त्यांच्यावर तब्बल १०५ केंद्रांची जबाबदारी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा खरोखर कॉपीमुक्त होतेय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणातून पुढे चांगली नोकरी, रोजगार मिळावा म्हणून विविध राज्यातील, जिल्ह्यातील विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरातील उच्च महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. पण, २१ वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात परराज्यातील अगदी बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. त्यामागे अध्यापन, परीक्षा, गुणवत्ता हीच कारणे आहेत. महाविद्यालयात नियमित तास होत नाहीत, परीक्षेत म्हणावी तेवढी पारदर्शकता दिसत नाही, निकालात गोंधळ, परीक्षेच्या वेळापत्रकात सतत बदल, निकाल विलंब अशी कारणे आहेत.
पण, जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि परीक्षा केंद्रांची संख्या पाहता पारदर्शक परीक्षेसाठी किमान १० तरी भरारी पथके आवश्यक असताना केवळ तीन भरारी पथकावर १०५ केंद्रांची जबाबदारी आहे. या पथकाला परीक्षा चालू असताना दररोज प्रत्येक केंद्राला भेट देताच येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. अजूनही भरारी पथके वेळेअभावी काही केंद्रावर गेलीच नाहीत. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्याकडून यात सुधारणा होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.
कॉपीमुक्त परीक्षेवर भर
तीन सत्रात परीक्षा सुरू असून भरारी पथकाला दररोज किमान पाच केंद्रांना अचानक भेटी देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त होण्यासाठी त्या त्या केंद्रांवर बैठे पथक देखील आहे. पुढे भरारी पथके वाढविली जातील.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर
महाविद्यालयांमध्ये नियमित तास होतात का?
परीक्षेच्या दोन सत्रात किमान ९० दिवसांचे अंतर अपेक्षित असते. सध्या खासगी कोचिंग क्लासेसच्या जमान्यात उच्च महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे विशेषतः कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे नियमित तास होतात का, याचे उत्तर कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे नियमित तास होतात का, याची खातरजमा अचानक भेटीतून कधीही विद्यापीठाकडून होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डाकडून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच विद्यापीठाची प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र विद्यार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयातच घेतली जाते हे विशेष.
भरारी पथके अन् त्यांच्यावरील जबाबदारी
१) सोलापूर शहर : सोलापूर शहर, मंद्रुप, अक्कलकोट, बोरामणी, कंदलगाव व वडाळा
२) ग्रामीण १ : बार्शी, वैराग, शेळगाव, कुर्डुवाडी, माढा, टेंभुर्णी, जेऊर, करमाळा, मोहोळ, अनगर व मोडनिंब
३) ग्रामीण २ : पंढरपूर, सांगोला, जुनोनी, अकलूज, वेळापूर, नातेपुते, माळशिरस, मंगळवेढा
विद्यापीठाच्या परीक्षेची स्थिती
संलग्नित महाविद्यालये
१०९
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे
१०५
एकूण परीक्षार्थी
७२,०००
भरारी पथके
३