Nagpur To Goa, Shaktipith Expressway : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. कोल्हापूर, सांगली अन् नांदेडमधून महामार्गाला विरोध होत आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधकांनी रान उठवलेच आहे, त्यात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. अशोक चव्हाण यांनाही शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचं म्हटलेय. नांदेडमधून जाणारा शक्तीपीठ महामार्गाला पर्याय शोधावा, असे त्यांनी सांगितलेय. नागपूर ते गोवा यादरम्यान होणारा शक्तीपीठ महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. ८०२ किमीचा हा महामार्ग देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे असेल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत शक्तीपीठ महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास २० तासांवरून ८ तासांवर येणार आहे, म्हणजे १० ते १२ तासांचा वेळ वाचणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे १२ जिल्ह्यांची कनेक्टिविटी वाढेल. पर्यटन, विकासाला चालना मिळेलच, त्याशिवाय धार्मिक अन् भावनिक लोकांना जोडण्यासाठी तयार केला जात असल्याचं बोललं जातंय.
शक्तीपीठ नाव का दिलं? एक्सप्रेसवेचा मार्ग कसा आहे?देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे देण्यात आलं. महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि रेणुकादेवी या तीन शक्तीपीठाला हा महामार्ग जोडणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होणार आहे तर महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पतरादेवी येथे संपणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे.
कोण कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार?शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा माहामार्ग जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर , नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर , पट्टणकोडोली, कणेरी , आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे.
शक्तीपीठसाठी किती खर्च होणार? शक्तीपीठ महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत. शक्तीपीठ महामार्गासाठी ८६००० कोटी रूपये इतका खर्च होणार होणार आहे. भारतामधील हा सर्वात लांब महामार्ग ठरणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वे पेक्षाही लांब महामार्ग असेल. फायदा काय होणार ?2030 सालापर्यंत हा महामार्ग सामान्यांसाठी खुला करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे
शक्तीपीठ महामार्गामुळे लोकांना देवदर्शन अधिक सोपं होईल.
प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
जिल्ह्यांना जोडून, आर्थिक विकासाला चालना मिळेल.
रोजगार उपलब्ध होईल.
स्थानिक पातळीवर आर्थिक विकास होईल.
शक्तिपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला सर्वांगीण चालना मिळणार