सध्या सगळीकडे कोल्डप्ले या कॉन्सर्टची चर्चा आहे. या कॉन्सर्टला जेणेक कलाकारांनी आणि स्टार किड्सने हजेरी लावली होती. या बॅण्डमध्ये असणाऱ्या ख्रिस मार्टिनसोबत त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री डकोटा जॉन्सन देखील भारतात आली आहे. इथे आल्यावर तिने दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र यादरम्यान तिच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री गायत्री जोशी.
डकोटासोबत गायत्री आणि सोनाली बेंद्रे या दोघीही सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र गायत्रीला पाहताच नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. अनेक चाहत्यांनी तिला ओळखलं. आणि पुन्हा एकदा ती सध्या काय करते असे प्रश्न उभे राहिले. गायत्री अभिनेता शाहरुख खान याच्यासोबतचा 'स्वदेश' या चित्रपटात दिसली होती. आणि हाच तिचा शेवटचा चित्रपट ठरला.
ती 1999 मध्ये मिस इंडियामध्ये सहभागी झाली होती आणि टॉप 5 पर्यंत मजल मारली. गायत्रीने स्वदेशच्या रिलीजनंतर एका वर्षातच संसार थाटला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. तिने एका मुलाखतीत सांगितलेलं, 'स्वदेश सिनेमानंतर मला अनेक संधी मिळतील असं वाटलं होतं. पण अनेकदा आपण विचार करतो तसं होतंच असं नाही. मला वाटलं होतं की मी लग्नानंतरही फिल्म्समध्ये काम करेन, पण नंतर कुटुंबासाठी मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.'
गायत्री सध्या काय करते?गायत्रीने 2005 साली विकास ओबेरॉयसोबत लग्नगाठ बांधली. विकास ओबेरॉय मोठे उद्योजक असून त्यांची रिअल इस्टेट टायकून अशी ओळख आहे. त्यांची मुंबईत रिअर इस्टेट फर्म आहे. गायत्री सुद्धा त्यांचा बिझनेस सांभाळते.