तुळजापूर : शहरात चोरट्यांनी मंगळवारी (ता. २१) पहाटे धुमाकूळ घालत अॅड. स्वाती शिंदे यांच्या घरातून सुमारे एक लाखावर ऐवज चोरून नेला. त्यानंतही अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत चोरटे पसार झाले. मात्र, याप्रकरणी दुपारी चारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
शहरातील कृष्णा कॉलनीमध्ये कदम हॉस्पिटलपासून पुढे जाणाऱ्या रस्त्यानजीक, लोहियाजवळ तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. कंत्राटदार सुनील चव्हाण, अभियंता राजाभाऊ वडणे यांच्या घरीदेखील चोरीचा प्रयत्न झाला असून, प्रशांत अपराध यांच्या घराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न झाला. अॅड. स्वाती शिंदे यांनी सांगितले की, घरातील सुमारे एक लाखाच्या ऐवजासह ५० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
पेट्रोलिंग वाढवा : तुळजापूर शहरासह उपनगरात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविणे गरजेचे आहे. ज्या भागात रात्रीच्या वेळी जास्त लोकांची ये-जा नसते, त्या ठिकाणी असे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्नआमच्या भागामध्ये राजाभाऊ वडणे हे बाहेरगावी गेले होते. कंत्राटदार सुनील चव्हाणही परगावी गेलेले असल्याने त्यांच्या बंद घरामध्ये चोरटे घुसले. त्यांनी घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या; तसेच माझ्या घराचा कडीकोयंडादेखील चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत अपराध, नागरिक, तुळजापूर
चोरट्यांनी गुंगीचे औषध फवारले
चोरट्यांनी विशिष्ट प्रकारचा स्प्रे फवारला होता. चोरटे आल्याची जाणीव झाल्यानंतर आम्ही ११२ क्रमांकावर फोन केला, पोलिस आलेही, मात्र भुरटे चोर असतील, असा अंदाज त्यांनी आमच्या घरी आल्यानंतर व्यक्त केला. आठ महिन्यांपूर्वीसुद्धा आमची दुचाकी चोरीला गेली होती. ती पुन्हा सापडली. घरातील पन्नास हजार रुपये रोख तसेच काही वस्तू चोरीला गेलेल्या आहेत.
अॅड. स्वाती शिंदे, नागरिक, तुळजापूर
मी बाहेरगावहून तुळजापूर येथे परत येण्यास निघालो. मला शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी माझ्या घरी भेट दिली आहे. तिथे आल्यावरच कोणत्या वस्तू चोरी गेल्या ते उघड होईल.
सुनील चव्हाण, नागरिक, तुळजापूर
कर्मचारी घटनास्थळीज्या ठिकाणी चोरीचे प्रयत्न झालेले आहेत, तेथे कर्मचारी भेट देऊन आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत.
रवींद्र खांडेकर, पोलिस निरीक्षक, तुळजापूर