मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (ता. 22 जानेवारी) घडली. सायंकाळी 4.30-05 वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ एका अफवेमुळे पुष्पक एक्स्प्रेसमधून उडी घेतलेल्या प्रवाशांचा कर्नाटक एक्स्प्रेस खाली येऊन जीव गेला आहे. पण या घटनेनंतर मुंबईकरांच्या 1993 मध्ये घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण त्यावेळी मुंबई लोकलमध्ये सुद्धा अशीच आग लागल्याची अफवा उडाली होती. ज्यामध्ये तब्बल 49 महिला प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. जाणून घेऊ काय होती ती घटना… (Train Accident in Jalgaon as same accident happening in Mumbai in 1993)
मुंबईत सर्वात पहिल्यांदा 05 मे 1992 ला चर्चगेट ते बोरिवली अशी लेडीज स्पेशल लोकल सोडण्यात आली. त्यानंतर 1993 मध्ये ही ट्रेन विरारपर्यंत धावली. सध्या मुंबईत लेडीज स्पेशल ट्रेनच्या 10 पेक्षा अधिक फेऱ्या होत आहेत. परंतु, याच महिला विशेष ट्रेनमध्ये 1993 मध्ये मोठी दुर्घटना घडली. चर्चगेटवरून सुटलेली लेडीज स्पेशल लोकल कांदिवली स्टेशनमधून पुढे गेली होती. तेव्हा अचानक एका डब्याला आग लागल्याच्या भीतीनं लोकलमधील महिलांमध्ये गोंधळ उडाला. तेव्हा महिलांना बाजूच्या ट्रॅकवर उड्या घेतल्या. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या फास्ट लोकलने या महिलांना चिरडले. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता, तसेच विजपुरवठा सुद्धा खंडित झाल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.
हेही वाचा…Jalgaon Train Accident : आगीच्या भीतीने घेतल्या उड्या, पण समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसने दिली धडक
कांदिवली स्टेशन सोडल्यानंतर एका महिलेला लोकलच्या डब्यात धूर येत असल्याचे दिसले. त्यामुळे ती महिला आग आग असे ओरडू लागली. ज्यानंतर लोकलच्या डब्यात एकच गोंधळ झाला. महिला जीव वाचविण्याकरिता पळापळ करू लागल्या. ज्यामुळे डब्यात चेंगराचेंगरी सुद्धा झाली. यावेळी काही महिलांनी लोकलची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकल न थांबल्याने महिलांनी बाहेर उड्या मारल्या. दुर्दैवाने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या ट्रॅकवर उड्या मारणाऱ्या अनेक महिलांना दुसऱ्या लोकलने चिरडल्याने प्राण गमवावे लागले.
या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देत म्हटले होते की, ही घटना घडली तेव्हा मुसळधार पावसासोबतच विजांचा कडकडाट सुरू होता. यातीलच विजेचा लोळ रेल्वेच्या ओव्हरहेड वायरजवळ चमकल्याने आग लागली असावी, असं महिलांना वाटले आणि त्यांनी भीतीने डब्यातून उड्या मारल्या असाव्यात. कांदिवली स्थानकाजवळ घडलेल्या त्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी भीषण असे दृश्य होते. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलने महिलांना चिरडले होते. यातील महिलांचे मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हते. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणीही साचले होते. परंतु, त्यावेळचे दृश्य हे अंगावर काटा उभा करणारे होते.
हेही वाचा… Jalgaon Train Accident : रेल्वेत आग लागल्याची अफवा अपघाताचे कारण नाही; त्याआधी…