Amravati News : दुर्दैवी..तूर काढणीचे काम करताना यंत्रात पडून मजुराचा मृत्यू; परिसरात खळबळ
Saam TV January 23, 2025 01:45 AM

अमर घटारे 
अमरावती
: शेतात लागवड करण्यात आलेल्या तुरीच्या काढणीला सध्या सुरवात झाली आहे. अशातच तूर काढणी करत असताना तूर काढणीच्या मशीनमध्ये पडून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यातील आडगाव खाडे गावाच्या शेत शिवारात घडली आहे. मशीनमध्ये अडकल्याने मजुराच्या पायाचे तुकडे झाले आहेत. 

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आडगाव खाडे या गावालगत असलेल्या शेतात सदरची घटना घडली आहे. यात अंकुश रंगराव सरदार (वय ३२) असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. दरम्यान तूर काढणीसाठी स्वतंत्र असलेल्या हेडंबा मळणी यंत्राच्या कटर याचा वापर आता करत असतात. अर्थात या मशीनद्वारे तूर काढणीचे काम लवकर आणि कमी माणसांच्या वापर करून होत असतो. त्यानुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आडगाव खाडे येथे काम सुरु होते. 

मशीनवर असताना गेला तोल 

तूर काढणीच्या कामासाठी हेडंबा मळणी यंत्र या कटर मशीनद्वारे तूर काढणी सुरु होती. यासाठी अडगाव नबापूर शेत शिवारात अंकुश रंगराव सरदार (वय ३२) हे उमेश हेंड यांच्या शेतात तुर काढणीच्या कामासाठी गेले होते. अंकुश सरदार मळणी यंत्रावर तूर काढण्यासाठी तुरीच्या झाडाच्या काड्या यंत्रात टाकण्याच्या काम करण्यासाठी मशीन वर चढलेले होते. हे काम करत असताना त्यांचा तोल गेला गेल्याने ते मळणी यंत्राच्या कटरमध्ये पडले. यात क्षणार्धात अंकुश हे मशीनच्या आतमध्ये ओढले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

शेतातील घटनेने खळबळ 
तूर काढणीच्या हेडंबा मळणी यंत्राच्या कट्टरमध्ये अंकुश हे पडल्याने आतमध्ये ओढले जाऊन त्यांचा पाय व कमरेचे तुकडे झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतातील अन्य मजूर व शेतमालक प्रचंड घाबरले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी अंजनगाव सूर्जी येथील पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.