जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत रेल्वेखाली येऊन किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभाग भुसावळच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर मोफत उपचार केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात ट्रॅकवर उभ्या असलेल्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांना असं वाटलं की त्यांच्या रेल्वेला आग लागली. त्या भीतीने त्यांनी रेल्वेतून समोरच्या ट्रॅकवर उड्या मारल्या.
त्याच वेळी कर्नाटक एक्सप्रेस ट्रॅकवर आली आणि त्यात काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाटक एक्सप्रेस मनमाडकडून भुसावळकडे जात असतान ही घटना घडली.
या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.
तर, 12 जखमी प्रवाशांवर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीला सांगितले.
BBC BBC मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव रेल्वे दुर्घटनेप्रति शोकसंवेदना व्यक्त करून, श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करत, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच, मंत्री गिरीश महाजन यांना दुर्घटनास्थळी पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.
फडणवीस म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत."
फडणवीस पुढे म्हणाले, "घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.
"ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
पालकमंत्र्याकडून घटनास्थळाचा आढावाजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. पाटील म्हणाले, "मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासनाला सर्वोतोपरी मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत."
घटनास्थळी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, मृत व जखमी प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी हा कक्ष कार्यरत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत योग्य ती चर्चा देखील सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
BBCकेंद्र सरकार व रेल्वे विभागाच्या संपर्कात जिल्हा प्रशासन घटनेच्या अनुषंगाने रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मदतकार्य जलदगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रियारेल्वे दुर्घटनेवर राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मला जळगाव एसपींचा फोन आला, मी थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचत आहे. त्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होईल.
अतिशय दुर्देवी अशी घटना घडली आहे. नेमकं काय घडलं? किती मृत्यू झाले, किती जखमी आहेत हे तिथे पोहचून कळेल. सध्याच्या परिस्थितीबाबत फोनवरुन कळालं आहे. काही जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत."
रेल्वे प्रशासन काय म्हणाले?मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला घटनेबाबत माहिती देताना म्हणाले, "लखनौवरून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस ही माहेजी आणि परधाडे स्टेशनदरम्यान अलार्म चेन पुलिंगमुळे थांबली होती. यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशी बोगीतून खाली उतरले होते.
BBCदरम्यान, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्प्रेसखाली येऊन या प्रवाशांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे प्रशासनातर्फे घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)