Ajit Pawar: चहावाल्याच्या एका वाक्यामुळे गोंधळ उडाला अन्..., अजित पवारांनी सांगितलं जळगाव रेल्वे अपघातामागचं खरं कारण
Saam TV January 23, 2025 09:45 PM

जळगावच्या पाचोरातील परधाडे गावाजवळ २२ जानेवारीला रेल्वेचा भीषण अपघात घडला. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि क्षणाचाही विलंब न करता प्रवाशांनी रेल्वेबाहेर उडी घेतली. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या कर्माटक एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना चिरडलं. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात घडला कसा? या अपघातासाठी कोण जबाबदार? याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

' घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती आम्ही घेतली. माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की, रेल्वे डब्यातील स्वयंपाक कक्षातील एका चहा विक्रेत्यानं आग लागली म्हणून आरडाओरड केली. आग लागली या भीतीनं गोंधळ उडाला. हा गोंधळ पाहून शेजारच्या दुसऱ्या डब्यातील प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी घाबरून जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उड्या मारल्या.'

'काही प्रवासी उतरू शकले. तर रेल्वेचा वेग अधिक असल्यामुळे काही प्रवासी उतरू शकले नाही. रेल्वेचा वेग जास्त असल्यामुळे एकानं रेल्वेची साखळी ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली आणि प्रवासी खाली उतरले. मात्र, शेजारच्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगानं येत होती. जीव वाचवण्याच्या घाईत प्रवासी सैरावैरा पळू लागले. रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना, कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं. त्यानंतर एक्सप्रेस पुढे जाऊन काही अंतरावर थांबली. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर, काही जण जखमी असल्याची माहिती समोर आलीय. यातील १० मृत लोकांची ओळख पटली तर, ३ मृत लोकांची ओळख पटलेली नाही. तसेच ही घटना निव्वळ अफवांमुळे घडली असल्याचं' यांनी सांगितलं.

जीबीएस सिंड्रोम संसर्गजन्य आजार नाही

'पुण्यात जीबीएस सिंड्रोमचे ५९ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा संसर्गजन्य आजार नसल्याचं सांगितलं. 'या आजाराबद्दल घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याबद्दलची जनजागृती केली जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्या', असं नागरीकांना आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आरोग्य जपण्यास सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.