Thane: रद्द केलेल्या कामाचे बिल काढण्याची घाई; पालिका प्रशासनाचा अजब कारभार
esakal January 23, 2025 09:45 PM

Thane : ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी थकीत असलेले कर वसूल करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.

दुसरीकडे तत्कालीन आयुक्तांनी स्वतंत्र शाळा दुरुस्तीची काढलेली निविदा रद्द करण्याचे आदेश दिले असताना पालिकेतील एका अधिकाऱ्याने ठेकेदारांच्या मदतीने त्या शाळांच्या दुरुस्तीच्या कामांचे पुन्हा कार्यादेश दिले असून ही कामे न करता त्याचे ८० लाखांचे बिल काढण्याची घाईदेखील पालिकेत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेतील या अजब कारभाराची चर्चा रंगू लागली आहे.

ठाणे महापलिका हद्दीतील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत शाळांची रंगरंगोटी, दुरुस्ती व इतर अशा चार कामांकरिता निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावेळी मे. श्रद्धा सुनील कदम आणि मे. सच्चिदानंद इंटरप्रायझेस या कंपनीला प्राप्त झाली होती; मात्र राज्य शासनाकडून शाळांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामांसाठी निधी प्राप्त झाल्याने कामांच्या एकत्रित निविदा काढण्यात आल्या, त्यामुळे या शाळांची स्वतंत्र निविदा रद्द करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते.

दरम्यान, या शाळांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेबाबतची माहिती माहिती अधिकारअंतर्गत सागर मावकर यांनी मागितली. यामध्ये रद्द करण्यात आलेल्या निविदेच्या फाईलची मागणी केली असता ती गहाळ झाल्याचे सांगण्यात आले.

चारही शाळांची कामे रद्द करण्यात आली असतानाही महापालिकेतील कार्यकारी अभियंता महेश अमृतकर यांनी संबंधित ठेकेदारांसोबत संगनमत करून रद्द करण्यात आलेल्या आदेशाची कागदपत्रे फाईलमधून काढून विद्यमान आयुक्त सौरभ राव यांना वस्तुस्थितीची जाणीव न करून देता रद्द करण्यात आलेल्या चारही कामांचे कार्यादेश संबंधित ठेकेदारांना मिळवून दिले, त्यातही हे काम न करता त्याचे ८० लाखांचे बिलदेखील काढण्याची लगीनघाई सुरू केली, असे सांगत माहिती अधिकार कार्यकर्ते सागर मावकर यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

शाळांच्या दुरुस्तीच्या कामांचे आदेश रद्द करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुठलेही बिल काढण्याचा हेतू या मागे नाही.
- महेश अमृतकर, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.