अंतराळातून पडली भली मोठी गरम 'रिंग', गावकऱ्यांना चिंता, अंतराळ संस्थेनं काय सांगितलं?
BBC Marathi January 24, 2025 12:45 AM
BBC अंतराळातून खाली पडलेली रिंग प्रचंड गरम होती. तिला थंड व्हायला जवळपास 2 तास लागले.

केनियाच्या एका गावातील रहिवासी काही दिवसांपूर्वी दुपारी कुटुंबीय, मित्रांबरोबर निवांतपणे बसले होते. त्याचवेळी एक मोठा आवाज ऐकू आला आणि त्यापाठोपाठ काहीतरी मोठं जमिनीवर कोसळल्याचा स्फोटासारखा आवाजही जाणवला.

"तो आवाज बॉम्बसारखा होता. मला धक्काच बसला. मी आजूबाजूला पाहू लागलो. कुठे गोळीबार तर झाला नाही, म्हणून शोधाशोध सुरू केली," असं मकुएनी काऊंटीतील मकुकु गावातील 75 वर्षीय शेतकरी स्टिफन मांगोका यांनी बीबीसीला सांगितलं.

"मी आकाशात काही धूर वगैरे दिसतो का म्हणून पाहू लागलो. पण काहाही नव्हतं."

"रस्त्यावर एखादा अपघात तर झालेला नाही? हे पाहण्यासाठी मी धावलो. पण तिथंही काही नव्हतं. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की, आकाशातून काहीतरी खाली पडलं आहे."

एक मोठ्या आकाराची गोल रिंगसारखी काहीतरी वस्तू आकाशातून नदीच्या कोरड्या पात्राला लागून असलेल्या एका शेतात पडली होती. ती वस्तू प्रचंड गरम होती.

"आम्हाला एक धातूचा मोठा तुकडा दिसला. तो प्रचंड लाल होता. त्यामुळं कुणालाही त्याच्या जवळ जाता यावं म्हणून आम्हाला काही वेळ वाट पाहावी लागली," असं अॅन कनुना यांनी सांगितलं. ज्या शेतात ती वस्तू पडली ते शेत त्यांच्या मालकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

भल्या मोठ्या आकाराची ती रिंग थंड व्हायला जवळपास दोन तास लागले. तिचा रंग करडा झाला. पण थंड होईपर्यंत परिसरात हा चर्चेचा विषय बनला आणि लोकांनी ते पाहण्यासाठी तिथं गर्दी करायला सुरुवात केली.

त्यादिवशी म्हणजे सोमवारच्या (30 डिसेंबर) दुपारी नववर्षाच्या आधीचा दिवस असल्यानं फार कमी लोक कामावर होते. त्यामुळं याठिकाणी ती धातूची रिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी संख्येनं लोक जमले होते.

त्यानंतर जणू ते सेल्फीचं ठिकाण बनलं होतं. लोक त्याच्यासमोर येऊन फोटो काढू लागले. नेमकं काय असावं? यावरून विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.

BBC

BBC गावकऱ्यांनी रात्रभर दिला पहारा

मकुएनी काऊंटीतील स्थानिक प्रशासनानं तिथून जवळपास 115 किलोमीटर अंतरावर असलेल्या केनियाची राजधानी नैरोबीमधील संबंधितांना याची माहिती दिली.

केनियाच्या अंतराळ संस्थेला (KSA-Kenya Space Agency) याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी जाऊन या प्रकरणाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

पण परिसरात या रिंगची एवढी चर्चा झाली होती की, मुकुकु गावातील गावकऱ्यांनी रात्रीतून तिची चोरी होईल, अशी भीती वाटू लागली.

Peter Njoroge / BBC मुकुकु गावातील गावकऱ्यांनी रिंग पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

त्यापैकी काही लोकांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या साथीनं त्याठिकाणी आळी-पाळीनं पहारा दिला. जवळच आग पेटवून रात्रभर त्यावर नजर ठेवली. भंगार म्हणून विकण्यासाठी नजर असलेले काही लोक किंवा उत्सुकता असलेल्यांना यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी पहारा दिला.

या रिंगच्या आकाराचा विचार केला असता तिचं वजन 500 किलो पेक्षा जास्त असावं असं सांगण्यात येत आहे. तर या रिंगचा व्यास जवळपास 2.5 मीटर म्हणजे 8 फुटांच्या आसपास असू शकतो. अंदाजे लहान मुलांच्या 4 सीटर मेरी गो राऊंडचा आकार एवढा असतो.

अंतराळ संस्थेनं काय म्हटलं?

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला त्याठिकाणी आणखी बघ्यांची गर्दी झाली. तसंच KSA चं पथक आणि माध्यमांचीही गर्दी याठिकाणी पाहायला मिळाली.

मुकुकुमध्ये कधीही अशी घटना घडली नव्हती. त्यादिवशी काही वेळानं KSA नं ती वस्तू त्याठिकाणाहून हटवली. पण नंतर त्या शेतात पडलेली वस्तू नेमकी काय होती, याच्या विविध चर्चांना उधाण आलं.

ही वस्तू म्हणजे स्पेस लाँच रॉकेटमधील सेपरेशन रिंग असू शकते, असं प्राथमिक तपासावरून लक्षात येत असल्याचं KSA नं सांगितलं.

"असे पार्ट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच जळून जातील किंवा समुद्रासारख्या मोकळ्या जागेत पडतील अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात," असं KSA नं दुसऱ्या दिवशी जारी केलेल्या निवेदनात सांगितलं.

Peter Njoroge / BBC केनियाच्या अंतराळ संस्थेच्या तज्ज्ञांनी रिंगची पाहणी केली.

ही रिंग पडल्यानं कुणालाही इजा झाली नाही. पण ही रिंग कोसळल्यामुळं मुकुकुमधील काही रहिवाशांनी त्यांच्या घरांचं नुकसान झाल्याची तक्रार केली.

क्रिस्टिन किओंगा या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर राहतात. त्यांनी त्यांच्या घराला गेलेले तडे आम्हाला दाखवले. ही वस्तू पडल्यानंतरच हे घडल्याचं त्यांनी सांगितलं.

इतर काही गावकऱ्यांनी त्यांच्या घराच्या एकूण ढाचाचं नुकसान झाल्याची तक्रार केली. पण अद्याप या दाव्यांची पुष्टी करण्यात आलेली नाही.

"यामुळं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारनं या वस्तूची मालकी कुणाची आहे हे शोधावं," असं मुकुकुमधील रहिवासी बेन्सन मुटुकु यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

गावकऱ्यांना रेडिएशनची भीती

स्थानिक माध्यमांमध्ये काही अशाही बातम्या आल्या की, काही रहिवाशांनी या धातूच्या रिंगच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार केली होती. पण जेव्हा आम्ही गावातील लोकांनी भेटलो आणि चर्चा केली तेव्हा त्यांच्याकडून किंवा प्रशासन किंवा KSA कडून मात्र तशी काही माहिती मिळाली नाही.

दरम्यान, मुटुकु यांनी या वस्तूच्या रेडिएशनमुळं दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंताही व्यक्त केली.

"ही अंतराळातून पडलेली वस्तू आहे. इतर काही अशा प्रकारच्या घटनांमध्ये असं ऐकण्यात आलं आहे की, अशा प्रकारच्या रेडिएशनमुळं भविष्यातील काही पिढ्यांवरही परिणाम होऊ शकतात. त्यामुळं याठिकाणच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे."

मात्र, नंतर केनियाच्या अण्विक नियंत्रण प्राधिकरणानं काही चाचण्या केल्या. त्यात असं समोर आलं की, याठिकाणी असलेलं रेडिएशनचं प्रमाण हे नक्कीच जास्त होतं. पण तसं असलं तरीही, त्याची पातळी ही मानवांसाठी त्रासदायक नसल्याचं त्यांनी सांगितलं.

पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये अंतराळ संबंधी घटनांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2017 मध्ये KSA ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे इंजिनीअर सध्या वस्तूचा अभ्यास करत आहेत.

Peter Njoroge / BBC रॉकेटची ही रिंग मुकुकु गावापासून काही अंतरावरच पडली.

KSA चे महासंचालक म्हणाले की, पृथ्वीवर ही वस्तू पडली तेव्हा सुदैवानं काहीही मोठी हानी झाली नाही.

"अशा प्रकारे अंतराळातून पडलेल्या वस्तूमुळं झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी ही, ज्या देशानं संबंधित यानाचं उड्डाण केलेलं असेल, त्यावरच असते," असं ब्रिगेडियर हिलरी किप्कोस्गे यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

अंतराळ बाह्य घटनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या नियंत्रणात झालेल्या बाह्य अंतराळ करारानुसार, "अंतराळाशी संबंधित एखाद्या वस्तूमुळं झालेल्या नुकसानीची जबाबदारी, संबंधित देशावर असेल.".

"अशा प्रकारची रिंग ही अनेक रॉकेटमध्ये वापरली जाते. त्यामुळं ती नेमकी कोणत्या रॉकेटची आहे किंवा कुणाची आहे, याचा अंदाज लावणं कठिण आहे. आमच्याकडं काही पुरावे आहेत, पण त्यातून कोणताही निष्कर्ष काढणं शक्य नाही," असंही किप्कोस्गे म्हणाले.

बीबीसीनं याचे फोटो युकेच्या अंतराळ संस्थेच्या तज्ज्ञांना दाखवले आणि त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

"ही वस्तू म्हणजे 2008 मधील एरियन रॉकेटच्या वरच्या भागाची सेपरेशन रिंग असण्याची सर्वाधिक शक्यता आहे," असं युकेच्या अंतराळ संस्थेचे लाँच डायरेक्टर मॅट आर्कर म्हणाले.

"उपग्रह तर ठीक आहे, पण रॉकेटचा एक भाग मात्र पुन्हा कक्षेबाहेर आला."

अंतराळातील कचऱ्याची समस्या

एरियन हे युरोपातील सर्वात महत्त्वाचं रॉकेट लाँच व्हेइकल होतं. त्या माध्यमातून 230 हून अधिक उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. 2023 मध्ये ते निवृत्त झालं.

ही सेपरेशन रिंग अशाप्रकारे मुकुकुमध्य कोसळण्यापूर्वी अंदाजे 16 वर्षे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पूर्व आफ्रिकेच्या भागात अशाप्रकारे अंतराळातील वस्तू किंवा कचरा आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही.

जवळपास दीड वर्षांपूर्वीच पश्चिम युगांडाच्या काही गावांमध्ये अंतराळातील कचरा किंवा वस्तू पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

तसंच काही दिवसांपूर्वी 8 जानेवारीला काही बातम्या आल्या होत्या. त्यात उत्तर केनिया आणि दक्षिण इथियोपियामध्ये आकाशात अंतराळातील काही वस्तू चमकत असल्याचं त्यात म्हटलं होतं. पण त्याला दुजोरा मिळाला नाही.

BBC अंतराळातून कोसळलेली रिंग.

अंतराळ व्यवसाय जसा विकसित होतो, तशा या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं आफ्रिकेतील सरकारला अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे.

नासाच्या अंदाजानुसार सध्या अंतराळाच्या कक्षेत 6,000 टन पेक्षा जास्त कचरा आहे.

अशा प्रकारच्या वस्तूमुळं दुर्घटना घडण्याचे अनेक अंदाज व्यक्त केले जातात. पण शक्यतो अशा 10 हजारपैकी एखादा अंदाजच खरा ठरतो.

पण हे आकडे मुकुकुच्या रहिवाशांसाठी मात्र दिलासा देणारे नाहीत. कारण ही रिंग शेताऐवजी गावात मध्यभागी कोसळली असती तर किती नुकसान झालं असतं, असा विचार सध्या त्यांच्या मनामध्ये सतत रेंगाळत आहे.

"असं काही पुन्हा घडणार नाही, याची आम्हाला सरकारकडून खात्री हवी आहे," असं रहिवासी मुटुकु म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.