संजय सूर्यवंशी
नांदेड : सात वर्षांच्या चिमुकलीला गावातीलच एका महिलेने दोन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांनी या चिमुकलीचा तपास लागला असून या प्रकरणी महिलेसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान अघोरी विद्या किंवा नरबळीच्या उद्देशाने महिलेने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील परांडा या गावातून प्रांजली कदम ही सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. २० जानेवारीला प्रांजली शाळेतून बाहेर पडली आणि बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न आल्याने तिच्या आई- वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र मुलगी सापडली नाही. यामुळे तिच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार माळाकोळी ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती.
दोन जणांनी नेले होते उचलून
गावातीलच महिला शोभाबाई गायकवाड (वय ५५) हिने त्या मुलीला दोन दिवस घरात डांबून ठेवले होते. २० जानेवारीला सायंकाळी साडे चार वाजता प्रांजली शाळेतून येत असताना दोन दुचाकीस्वारांनी तिला उचलून नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता शोभाबाई गायकवाड हिचे नाव समोर आलं. यानंतर महिलेच्या ताब्यात असलेल्या मुलीची सुटका करण्यात आली.
महिलेसह दोन जण ताब्यात
पोलिसांनी शोभाबाई गायकवाड या महिलेसह इतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र मुलीचे अपहरण नरबळी किंवा अंधश्रद्धा या कारणावरून करण्यात आले होते का किंवा इतर कारणासाठी मुलीचे अपहरण करण्यात आले होते? याचा तपास पोलीस करीत आहेत. नरबळीसंबंधी अजून ठोस असा पुरावा मिळाला नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.