Pune News, 23 Jan : काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून हल्ला (Saif Ali Khan attack) करण्यात आला. या हल्ल्यातील हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर या हल्ल्यानंतर सैफ अली खान उपचार घेऊन घरी देखील गेला आहे.
उपचारानंतर सैफ घरी जातानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओवरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेयांनी सैफवर नक्की हल्ला झाला आहे की तो अॅक्टिंग करत आहे? असा संशय व्यक्त केला आहे. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी देखील संशय व्यक्त केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी संशय व्यक्त केला.
राणे म्हणाले, "सैफ बाहेर येऊन असा चालत होता की, मलाच संशय आला याला खरच कोणी चाकू मारला की हा अॅक्टिंग करुन बाहेर पडला आहे." असं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजितदादा म्हणाले, नितेश राणे हे कालच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांच्या आढावासाठी माझ्याकडे आले होते. मात्र ते काय बोलले याबाबत माहिती नाही.
या घटनेबाबत जर नितेश राणे यांच्या मनात वेगळं काही आलं असेल तर त्यांनी ते डिपारमेंटला सांगावं. मात्र आता हल्ला करणारी व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर बांगलादेशवरून आला होता. मुंबईचं आकर्षण जसं देशातील लोकांना आहे. त्या पद्धतीनेच आजूबाजूच्या देशातील लोकांना देखील आहे. त्यामुळे मुंबईच्या () आकर्षणाने तो इथे आला होता. मुंबई पाहिल्यानंतर त्याला पुन्हा एकदा बांगलादेशला जायचं होतं.
त्यासाठी त्याला 50000 ची आवश्यकता होती. परंतु मागताना त्याने एक कोटी मागितले. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे. त्यावरून नितेश राणे म्हणतात तसा काही पुरावा मिळालेला नाही. मात्र, कदाचित सैफ अली खान जेव्हा त्यांच्या घरी जात होते. तेव्हा त्यांची तब्येत, कपडे वगैरे पाहता. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता का? असं काही जणांना वाटलं असेल.
सैफ यांची तब्येत मुळातच चांगली आहे. मात्र जे घडलं ते घडलं आहे. कारण नंतर आमची डिपारमेंटची लोकं पहाटे त्याला त्या ठिकाणी घेऊन गेली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सिन रीक्रिएशन केलं. तसंच तो कोणाच्या घरामध्ये घुसला होता त्याबद्दल त्याला माहिती होतं का? याबाबत देखील तपास करण्यात आला. मात्र त्याबाबत त्याला कोणतीही कल्पना नव्हती या भागात सर्व सेलिब्रेटी लोक राहतात एवढेच त्याला ठाऊक होतं.