Uruli Kanchan News : संगणक अभियंता महिला रमली रेशीम शेतीत
esakal January 24, 2025 04:45 AM

उरुळी कांचन - संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही स्वतःचे पॉलिहाऊस उभे करून त्यात तुतीची रेशीम शेती करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मनीषा काळूराम शेलार या इतर शेतकरी महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. तुतीची रेशीम शेती करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु न डगमगता त्यांनी एक यशस्वी रेशीम हायटेक नर्सरी उभी करून वार्षिक नफा २५ ते २८ लाख मिळूनही दाखविला.

तुतीची रेशीम शेती करण्यासाठी सर्वप्रथम मनीषा यांनी उरुळी कांचन येथील बायफ रोडलगत असणारी दोन एकर शेतजमीन भाडेतत्वावर घेतली. व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी पतसंस्थेतून कर्ज काढले. या व्यवसायासाठीचे प्रशिक्षण त्यांनी तळेगाव येथील आरईसीईटीआय या प्रशिक्षण संस्थेमधून घेतले. तसेच, तुती रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले.

त्यानंतर सन २०१९मध्ये त्यांनी तुती रेशीम हायटेक नर्सरी उभी केली. सध्या या नर्सरीत ८ महिला आणि २ पुरुष मजूर आहेत. सध्या तुती रोपे विक्रीसाठी बारामती ही त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता रेशीम शेतीविषयी माहिती शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन देतात.

रोपवाटिकेची वैशिष्ट्ये

  • तुतीच्या रेशीम शेतीला लागणारी व्ही१ जातीची १०० टक्के खात्रीची रोप पुरवठा करणारी महिला उद्योजिका म्हणून मनीषा शेलार यांची पंचक्रोशीत ओळख.

  • तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत तुती रोपांचा पुरवठा.

  • रेशीम तुती लागवड, रोपवाटिका प्रत्येकी एक एकरात

  • तुती रोपवाटिकांमधून दरवर्षी २५ ते २८ लाख उत्पन्न.

  • रोपवाटिकेमधून महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातसुद्धा रोपांचा पुरवठा.

कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित

भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा स्वर्गीय भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार वितरण सोहळा ११ जानेवारी रोजी उमरखेड येथील कृषी महाविद्यालयात पार पडला. यावेळी तुती रेशीम हायटेक नर्सरी महिला उद्योजिका म्हणून मनीषा शेलार यांना राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल, श्रीफळ स्वरूप होते.

रेशीम रोप वाटिकाच्या माझ्या बॅचेस चालू होत्या. त्या घेत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या, की तुतीच्या रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांना गादी वाफ्यातील उपटलेली रोपे विकली जातात. जेव्हा शेतकरी ते रोप लागवड करत तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या रोपांची मर होत. त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. तुतीची पिशवीतील रोपे ज्याची शंभर टक्के उगविण्याची क्षमता असते ती व्ही१ जातीची तुतीची रोपे तयार करण्याचे ठरवले. मागील वर्षी ८५ हजार रोपांची विक्री झाली आहे. त्यासाठी ‘रेशीम रत्न’ पुरस्कारप्राप्त झालेले शिवराज धर्मराज फाटे आणि रेशीम संचालनाचे डॉ. महेंद्र ढवळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

- मनीषा शेलार, शेतकरी, तुती रेशीम हायटेक नर्सरी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.