उल्हासनगर : घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींच्या मुसक्या आवळण्यात आघाडीवर असलेल्या उल्हासनगर क्राईम ब्रँचने मध्यरात्री जेसीबीची लाईट व मोबाईल टॉर्चच्या उजेडात हातभट्टी दारूचा मोठा अड्डा उध्वस्त केला आहे.यात 2600 लिटर दारू आणि लोखंडी टाक्यात गाडून ठेवलेला दारूसाठी लागणारा वॉश जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून नष्ट करण्यात आला आहे.
23 जानेवारीच्या रात्री क्राईम ब्रॅंचचे पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांना हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत द्वारली पाडा येथील गुरचरण मोकळ्या जागेतील झाडाझुडपांमध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे ऍक्शन मोडवर आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास उपनिरीक्षक प्रविण खोचरे,सहायक उपनिरीक्षक बबन बांडे,पोलीस गणेश गावडे,मंगेश जाधव,चंद्रकांत सावंत,विजय जिरे,रामदास उगले,संजय शेरमाळे,राजेंद्र थोरवे यांनी जेसीबी मशीन सह द्वारली पाडा गाठला.
आणि मध्यरात्री 12 ते 3 अशी तास कारवाईची मोहीम राबवून दोन पंचांच्या साक्षीने निर्मित होत असलेली हातभट्टीची 2600 लिटर दारू,लोखंडी टाक्यात गाडून ठेवलेला दारूसाठी लागणारा वॉश जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला व इतर साहित्य असा जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
या प्रकरणात द्वारली पाड्यातील आरोपी अविनाश रसाळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.यापूर्वी आरोपीवर कोळशेवाळी पोलीस ठाण्यात एक गंभीर स्वरूपाचा व हिललाईन पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत दोन गुन्हे दाखल असून आरोपीला हिललाईन पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.