Pune Crime: गंभीर गुन्ह्यात घट, पण महिला अत्याचारात वाढ; धक्कादायक आकडेवारी समोर
Saam TV January 25, 2025 01:45 AM
अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. रोज हत्या, अत्याचार, मारहाण, गोळीबार यासारख्या घटना पुण्यात होत आहेत. अशामध्ये पुण्यातून गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी नुकताच वर्षभरातील गुन्ह्यांच्या घटनांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये पुण्यात गंभीर गुन्ह्यामध्ये घट झाली असून महिला अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

वर्षभरात गंभीर गुन्ह्यात घट पण महिला अत्याचार आणि फसवणुकीत वाढ झाली आहे. पोलिस आयुक्तांनी २०२४ वार्षिक लेखाजोखा मांडला. २०२३ च्या तुलनेत मागील २०२४ या वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांत घट झाली. मागील वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्नांच्या गुन्ह्यांत तुलनेत घट झाली. पुणे शहरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्यांकडून कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला.

पुणे शहरात २०२३ मध्ये १०१ खून, तर २०२४ मध्ये शहरात ९३ जणांचा खून झाला. २०२३ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याच्या २४४, तर २०२४ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १८६ गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये २०२३ मध्ये ४१० महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. तर २०२४ मध्ये या घटनांमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये ५०५ घटना घडल्या.

पुणे शहरातील गुन्हेगारी दृष्टीक्षेपात - हत्येच्या घटना -

२०२४: ९३

२०२३:१०१

खुनाचा प्रयत्न -

२०२४: १८६

२०२३: २४४

फसवणूक -

२०२४: २०२१

२०२३: ११०८

दुखापत -

२०२४: १५३५

२०२३: १३९०

घरफोडी -

२०२४: ५२७

२०२३: ६०४

वाहन चोरी -

२०२४: १९८२

२०२३: १९८९

लैंगिक अत्याचार -

२०२४: ५०५

२०२३: ४१०

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.