इंदापूर : इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथील एकाला गावठी पिस्टल व पितळी बुलेट बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी राहुल दिलीप धोत्रे यांचेवर इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून चार चाकी गाडी सह दहा लाख 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जगन्नाथ रामचंद्र कळसाईत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राहुल दिलीप धोत्रे (वय 34 वर्षे, धंदा मजुरी, रा.निरा नरसिंहपुर, ता- इंदापुर) याचेकडे गुरुवार (ता.23) रोजी सकाळी 11:30 वाचे सुमारास मौजे निरा नरसिंहपुर येथे चार चाकी वाहन (क्रमांक एम. एच 13 सी के 2024) मध्ये कोणतीही अग्नीशस्त्र बाळगण्याची कायदेशीर परवानगी नसताना कार मध्ये पांढ-या रंगाची लोखंडी पत्राची गावठी बनावटीची पीस्टलची मॅक्झीन तसेच 3 जिवंत पितळी बुलेट (अग्नीशस्त्र दारूगोळा) आढळून आला.
यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून चार चाकी गाडी सह एकूण दहा लाख 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत करत आहेत.