पुणे - अशुद्ध पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा मेंदू विषयक आजार होत असल्याचे समोर आल्याचे पुणेकरांची चिंता वाढली आहेत. मात्र, शहरात खासगी टँकरच्या रोज हजारो फेऱ्या होत असूनही टँकरचालक हे पाणी कुठून भरतात ? ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? याची कोणतीही माहिती महापालिकेकडे नाही. त्यामुळे या अनियंत्रित कारभारामुळे नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
पुणे शहरात सध्या ‘जीबीएस’चे रुग्ण आढळून येत आहेत, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील काही रुग्णांच्या रक्त, लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले होते. त्यात केलेल्या तपासणीमध्ये ‘जीबीएस’ होण्यास कारणीभूत असलेला ‘कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी’ हा जिवाणू आढळला आहे. त्यामळे दूषित पाण्यामुळेच ‘जीबीएस’च्या रुग्णांची संख्या वाढल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नांदेड, धायरी यासह अन्य भागात जाऊन विहिरींची पाहणी केली. तसेच महापालिकेने १३ ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. ‘जीबीएस’च्या रुग्णांची जास्त संख्या सिंहगड रस्ता भागात ज्या ठिकाणी महापालिकेचे प्रक्रिया केलेले पाणी येत नाही अशा भागातील आहे.
याच भागात थेट विहिरीतून प्रक्रिया न करता थेट सोसायट्यांना पाणी पुरविले जात आहे. तेथे उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. मात्र, धायरी, नांदेड, नांदोशी, किरिकिटवाडी, नऱ्हे यासह अन्य भागात खासगी टँकरची संख्या बेसुमार वाढलेली आहे. येथे महापालिकेचे पाणी अपुरे पडत असल्याने किंवा महापालिका पाणीच देऊ शकत नसल्याने सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मोठ्या सोसायट्यांना रोजी २० पेक्षा जास्त टँकर लागत आहेत.
शहरात रोज हजारो टँकर पाणी पुरवठा करत असले तरी ते पाणी कुठून भरतात, टँकर भरणा केंद्राला येणारे पाणी कसे उपलब्ध होत आहे. ते कॅनॉल किंवा बोअर किंवा विहिरीचे आहे का याची कोणतीही माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नाही. त्यामुळे ‘जीबीएस’वर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी टँकर भरणा केंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.
‘खासगी टँकर पाणी कुठून आणतात याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पण ‘जीबीएस’चा धोका वाढत असल्याने ही माहिती संकलित केली जाईल. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे तपासले जाईल. त्यानुसार जे पिण्यायोग्य टँकरचालक पाणी पुरवठा करतात त्यांना परवाना दिला जाईल.
यासाठी प्रस्ताव तयार करून तो अतिरिक्त आयुक्त, आयुक्तांची मान्यता घेऊन अंतिम करू. सोसायट्यांनीही अशाच टँकरचे पाणी घ्यावे. तसेच सध्या ज्या टँकरचे पाणी घेत आहेत, त्याचे नमुनेही महापालिकेच्या प्रयोगशाळेत मोफत तपासून मिळतील.’
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा
राजकीय वरदहस्तामुळे मुजोरी
या भागातील टँकरचालकांना राजकीय वरदहस्त असून प्रचंड मुजोरीला सामोरे जावे लागते. पाणी कुठून आणले, कसे आणले याची कोणतीही माहिती व्यवस्थित दिली जात नाही. सिंहगड रस्त्यावर कॅनॉलच्या बाजूने काही विहिरी आहेत, तर काहींनी कॅनॉलमधील पाणी उचलण्याची व्यवस्था केलेली आहे. तेथून हे पाणी थेट टँकरमध्ये भरून सोसायट्यांना पुरविले जात आहे.