पुणे - एका महिलेला घरात डांबून पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मांतर करण्याच्या उद्देशाने अत्याचार केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे.
याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने २३ जानेवारीला विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका महिलेसह संतोष रामदास गायकवाड (वय ५५, रा. धानोरी), सागर मधुकर लांडगे (वय ३०, रा. माधवनगर, धानोरी) या संशयिताना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार एप्रिल २०२४ ते दोन जानेवारी २०२५ या कालावधीत घडला. आरोपी आणि पीडित महिलेची ओळख आहे. आरोपींनी महिलेला धर्मांतर करण्यासाठी प्रोत्साहित करून धानोरी परिसरात बोलावून घेतले. गायकवाड आणि लांडगे या दोघांनी तिला धानोरीतील आरोपी महिलेच्या घरात डांबून ठेवले. यानंतर दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांनी महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केला.
त्याचा मोबाईलवर व्हिडिओ काढून तो समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर एका आरोपीने महिलेला त्याच्या लोहगावमधील घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेला धमकावून लैंगिक अत्याचार केला, असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.