दिल्लीसाठी भाजपाचा तपशीलवार 'रिझोल्यूशन'
Marathi January 26, 2025 02:24 PM

विनामूल्य शिक्षण, गरीबांसाठी स्वस्त गॅस सिलिंडर

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी आपले विस्तृत ‘संकल्पपत्र’ सादर केले आहे. या संकल्पपत्रात गरजवंत विद्यार्थ्यांना केजी पासून पीजी पर्यंत विनामूल्य शिक्षण, गरीब परिवारांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला 10 लाख रुपयांचे विनामूल्य वैद्यकीय साहाय्य, झोपडपट्टीतील नागरीकांसाठी अटल खाद्य योजनेतून 5 रुपयांमध्ये आहार, तसेच वृद्धांच्या निधीत वाढ, अशा अनेक योजना आहेत.

तसेच, गरीब विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मेट्रो प्रवास, दिल्लीच्या युवकांसाठी पारदर्शी पद्धतीने 50 हजार नोकऱ्या, स्पर्धात्मक परीक्षांच्या सज्जतेसाठी विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांचे साहाय्य, अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कामगारांसाठी विमा आणि कर्जाची सुविधा, नोंदणीकृत कामगारांसाठी 3 लाख रुपये कर्ज आणि 10 लाख रुपयांचा आयुर्विमा, 1,700 हून अधिक अवैध वस्त्या वैध करणार, या वस्त्यांमधील लोकांना त्याच्या स्वामित्वाची घरे देणार, तसेच बंद दुकांनांना पुन्हा सुरु करणार अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.

वाहतूक व्यवस्था सुधारणार

दिल्लीत 13 हजार नव्या बसेसची व्यवस्था करण्याचे आश्वासनही भारतीय जनता पक्षाने दिले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीही अनेक कल्याणकारी योजना आणल्या जाणार आहेत. दिल्लीचे सार्वजनिक वाहतूक जाळे अधिक व्यापक केले जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करुन प्रवाशांना सुविधाजनक प्रवासाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

केजरीवाल यांच्यावर घणाघात

संकल्पपत्राचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अनेक केंद्रीय आणि स्थानिक नेते उपस्थित होते. दिल्लीचे सर्व सात लोकसभा खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे आठ आमदारही उपस्थित होते. या प्रसंगी भाषण करताना अमित शहा यांनी आम आदमी पक्षाने नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांच्यासारखा असत्याचरणी नेता आजवर मी पाहिलेला नाही. त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासने दिली. पण ती पाळली नाहीत. ते केवळ साळसूद चेहऱ्याने मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी त्यांची डाळ दिल्लीत शिजणार नाही. दिल्लीचे मतदार आम आदमी पक्षाला कंटाळले असून आता ते भारतीय जनता पक्षाला सत्तेची संधी देतील, असा विश्वास अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.