पुणे - लष्कर भागातील पदपथावर फिरस्त्या व्यक्तीचा (वय ६०) खून झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एकाविरुद्ध (वय ३६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील नेहरू मेमोरिअल हॉलसमोरील पदपथावर रात्री भिक्षेकरी झोपतात. गुरुवारी पहाटे दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.