मुंबई : टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा घटला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत टाटा मोटर्सचा निव्वळ नफा २२ टक्क्यांनी घसरून ५,५७८ कोटी रुपयांवर आला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ७,१४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ऑपरेटिंग उत्पन्न १,१३,५७५ कोटी रुपये राहिले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा १,१०,५७७ कोटी रुपये होता. ऑपरेशनल फ्रंटवर EBITDA मार्जिनमध्ये 60 बेसिस पॉइंटची घट नोंदवली आणि ते 13.7 टक्के झाले. तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च १,०७,६२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत खर्च १,०४,४९४ कोटी रुपयांवर होता. तिमाहीत कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या उत्पन्नात ४.३ टक्के घट झाली. उत्पन्न १२,४०० कोटी रुपयांवर आले. कंपनीने म्हटले की, आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत EBITDA मार्जिन १२० बेसिस पॉइंट्सने वाढून ७.८ टक्के झाला. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत जेएलआरने चांगली कामगिरी केली. या तिमाहीत महसूल ७.५ अब्ज डाॅलर राहिला.टाटा मोटर्सचे शेअर्स बुधवारी ४ टक्के वाढून ७५५ रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १,१७९.०५ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांची निचांकी किंमत ७०७.५५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २,७६,९८६.२४ कोटी रुपये आहे. सहा महिन्यांत हा शेअर्स ३५ टक्के घसरला आहे. पाच दिवसांत शेअर्स २ टक्के आणि एका महिन्यात ३ टक्के वाढला आहे.