ऑस्ट्रेलियाने मायदेशात टीम इंडियाला पराभूत करत 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. ऑस्टेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात टीम इंडियावर 3-1 अशा फरकाने मालिका विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धही तसाच तडाखा कायम ठेवत नववर्षातील नवकोऱ्या कसोटी मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सॉल्लिड सुरुवात केलीय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने शतकी खेळी केली. त्यानंतर आता उस्मान ख्वाजा याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं द्विशतक झळकावलं आहे.
उस्मानने सामन्यातील दुसऱ्या दिवशी 30 जानेवारीला डावातील 111 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर एक धाव घेत द्विशतक पूर्ण केलं. उस्मानने 290 चेंडूत 68.97 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या. उस्मानने या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकार लगावला. उस्मानच्या कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.उस्मानचा याआधी 195 हा बेस्ट स्कोअर होता. उस्मानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी 2023 मध्ये सिडनीत ही कामगिरी केली होती.
उस्मानने या द्विशतकी खेळीत ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. उस्मान आणि हेड या सलामी जोडीने 92 धावांची भागीदारी केली. तर त्यानंतर उस्मानने कर्णधार स्टीव्हन स्मिथसह तिसऱ्या विकेटसाठी 419 बॉलमध्ये 266 रन्सची पार्टनरशीप केली. स्टीव्हन स्मिथ याने 141 धावांची खेळी केली. स्टीव्हनने यासह कसोटी कारकीर्दीतल 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
दरम्यान स्टीव्हनचं शतक आणि उस्मानच्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 462 पार मजल मारली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणखी किती धावांनंतर डाव घोषित करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
उस्मान ख्वाजाचा द्विशतकी तडाखा
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, ओशादा फर्नांडो, दिनेश चांदीमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, जेफ्री वँडरसे आणि असिता फर्नांडो.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहनेमन, नॅथन लायन आणि टॉड मर्फी.